
>> मंगेश वरवडेकर
महाराष्ट्रात कबड्डीच्या मैदानावर घाम गाळणाऱ्या, लढणाऱ्या आणि देशाला अभिमान मिळवून देण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंच्या नशिबी पुन्हा एकदा उपेक्षा आली आहे. राज्य कबड्डी संघटनेत सत्तेसाठी सुरू असलेल्या राजकारणाचा फटका आता थेट मैदानावरील गुणवत्तेला बसला आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या 12 सदस्यीय हिंदुस्थानी पुरुष कबड्डी संघात महाराष्ट्राच्या आदित्य शिंदे, पंकज मोहिते आणि शुभम शिंदे यांसारख्या तगडय़ा खेळाडूंवर अन्याय करत हरयाणाच्या आठ खेळाडूंना स्थान देत राष्ट्राचा हरयाणवी संघ निवडला आहे; पण राज्याच्या खेळाडूंवर झालेल्या अन्यायाबाबत राज्य संघटनेच्या एकालाही ना चीड आली ना संताप हे विशेष!
जिंकून देणारेच बाहेर
यंदा 72व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या महाराष्ट्राला मात्र केवळ असलम इनामदारच्या रूपाने एकच प्रतिनिधित्व मिळाले. महाराष्ट्राच्या आदित्य शिंदेने तुफानी चढायांचा खेळ करत स्पर्धेत आपली छाप पाडली होती. तसेच रेल्वेला विजेतेपद मिळवून देण्यात महाराष्ट्राचेच पंकज मोहिते आणि शुभम शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तरीही आशियाई संघाच्या दारात त्यांच्यासाठीही जागा होऊ शकली नाही. मात्र रेल्वेकडून खेळलेल्या आशु मलिक, सुनील पुमार आणि सुमीत संगवान यांना आशियाई संघात स्थान मिळाले, पण रेल्वेला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे पंकज आणि शुभम मात्र संघाबाहेर. यावरून निवड प्रक्रियेत महाराष्ट्राच्या संघटकांचा आवाज क्षीण आणि हरयाणाचा प्रभावी झालाय हे कुणीही सांगू शकतो.
खेळाडूंसाठी मैदानाबाहेर कोण लढणार?
महाराष्ट्राचे खेळाडू मैदानावर लढतात, पण त्यांच्या हक्कासाठी मैदानाबाहेर लढणार कोण? आपल्या खेळाडूंच्या निवडीसाठी आवाज कोण उठवणार? निवड प्रक्रियेवर प्रश्न कोण उपस्थित करणार? निवड समितीसमोर महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या कामगिरीचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याची गरज असताना राज्याचे संघटक गप्प आहेत. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मैदान गाजवायचे आणि निवडीच्या वेळी मात्र त्यांच्यावर अन्याय करायचा हा प्रकार आता थांबला पाहिजे. आता हा आवाज कबड्डीप्रेमी आणि माजी कबड्डीपटूंनाच उठवावा लागणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीत हरलेल्या सेनादलाचे चौघे संघात
हिंदुस्थानी संघात हरयाणाचा दबदबा किती आहे हे सेनादलाच्या खेळाडूंच्या निवडीवरूनही दिसते. राष्ट्रीय स्पर्धेत सेनादलाचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच थांबला. तरीही देवांक दलाल, जयदीप दहिया, राहुल सेठपाल आणि अंकित जगलान या मूळ हरयाणाच्या खेळाडूंना आशियाई संघात स्थान मिळाले. याहून पुढे म्हणजे, उपउपांत्यपूर्व फेरीतच गारद झालेल्या हरयाणा संघातील अयान लोहचब यालाही आशियाई संघात स्थान मिळाले. या निवडीबाबत पुणालाही काही वाटले नाही हे विशेष.
संघ निवडीसाठी आर्थिक तडजोड?
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना हरयाणा सरकारकडून 3 कोटी रुपयांचे रोख बक्षीस दिले जाते. त्यामुळे आशियाई संघात स्थान मिळणे हे खेळाडूंसाठी केवळ प्रतिष्ठेचे नव्हे, तर आर्थिकदृष्टय़ाही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. महाराष्ट्रातही सुवर्णपदक विजेत्यांसाठी 75 लाखांच्या रोख पुरस्काराची तरतूद आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संघ निवडीमागे आर्थिक समीकरणे असल्याची चर्चा कबड्डी वर्तुळात नेहमीच रंगते. आर्थिक तडजोड संघातील स्थान पक्के करते, असे सर्वांचे मत आहे. याच तडजोडीत राज्याचे खेळाडू मागे पडतात आणि हरयाणवी खेळाडूंचे फावते. मात्र याबाबत पुणीही कधी आवाज उठवलेला नाही. महाराष्ट्राचे खेळाडू मैदानावर जीव ओतून खेळतात. विजयासाठी अंग झोपून देतात. राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचतात; पण जेव्हा देशाच्या जर्सीसाठी निवड होते, तेव्हा त्यांच्याच नावांवर काट मारली जाते, अशी भावना सामान्य कबड्डीपटूंच्या मनात निर्माण होत असेल तर महाराष्ट्राच्या कबड्डी संघटकांवर आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या हिंदुस्थानी पुरुष कबड्डी संघातील खेळाडूंचे मूळ राज्य
हरयाणा- आशु मलिक, अयान लोहचब, देवांक दलाल, सुनील पुमार, जयदीप दहिया, राहुल सेठपाल, सुमीत संगवान, अंकित जगलान. टदिल्ली- पवन सेहरावत, गौरव खत्री.
महाराष्ट्र- असलम इनामदार.
उत्तर प्रदेश – अर्जुन देशवाल.






























































