नाशिक कारागृहात रवानगी टाळण्यासाठी सर्पदंशाचे नाटक, सीसीटीव्हीमुळे नाट्य आले उघडकीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी टाळण्यासाठी पोलीस कोठडीतील महिला आरोपीने पायाला साप चावल्याचा दावा केला. त्यामुळे नेवासे पोलिसांची धावपळ उडाली. सर्पदंशाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तिला तातडीने नेवासे फाटा ग्रामीण रुग्णालयात हलवले. प्राथमिक तपासणीनंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, महिलेचा हा बनाव सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला.

अहिल्या दत्तात्रेय मैराळ (वय 38, रा. गंगापूर) या महिला आरोपीला बालविवाहाच्या प्रकरणात 18 ऑगस्टला अटक करण्यात आली होती. सध्या ती नेवासे पोलीस ठाण्यातील कोठडीत आहे.

सोमवारी (दि. 24) पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने अहिल्या मैराळ हिची न्यायालयीन कोठडीत रवानगी होण्याची शक्यता होती. मात्र, सकाळी तिने कोठडीत अचानक आरडाओरड सुरू केली. कोठडीत पायाला साप चावल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे तपासणी करून तिला घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली असता, तिला साप चावल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे सर्पदंशाचा दावा संशयास्पद ठरला. यानंतर पोलिसांनी लॉकअपमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी मैराळ हिचा बनाव उघड झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मैराळ स्वतःच्या पायाला पिनने टोचत असल्याचे दिसून आले. यानंतर तिला पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. नाशिकच्या कारागृहात जाणे टाळण्यासाठी सर्पदंशाचा बनाव केल्याचे तिने सांगितले, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांनी नेवासे कारागृह येथे येऊन पाहणी करत घटनेची माहिती घेतली.