
चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथे घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावत त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून चोरीस गेलेला तब्बल 4 लाख 45 हजार 842 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मार्गताम्हाणे, गोपाळवाडी परिसरात अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला.
पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर अवघ्या दोन तासांत गुन्ह्याचा उलगडा करत संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेला 4 लाख 45 हजार 842 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने केली. घरफोडीच्या घटनेनंतर अत्यंत वेगाने तपास करत पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचल्याने त्यांच्या कार्यक्षम तपासाचे कौतुक होत आहे.


























































