
नेपाळ आणि हिमालयाच्या पट्ट्यात हिमनद्या अत्यंत वेगाने वितळत आहेत. एका नव्या अहवालानुसार, २०५० पर्यंत गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या खोऱ्यातील हिमनद्या ३५ ते ४५ टक्क्यांनी कमी होऊ शकतात. यामुळे भविष्यात हिंदुस्थानातील अनेक राज्यांना आधी महापूर आणि त्यानंतर भीषण पाणीटंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अहवालानुसार, गेल्या ३० वर्षांत नेपाळमधील तब्बल एक तृतीयांश बर्फ वितळून नष्ट झाला आहे. आधीच्या दशकाच्या तुलनेत गेल्या दशकात हिमनद्या वितळण्याचा वेग ६५ टक्क्यांनी वाढला आहे. हिमनद्या वितळल्यामुळे सुरुवातीच्या काळात नद्यांना मोठे पूर येतील, तर दीर्घकाळात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होईल. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांना याचा सर्वाधिक फटका बसेल.
हिमालयातील तापमानवाढीचा वेग दुप्पट
फायनान्शियल टाइम्सच्या अहवालानुसार, हिमालयाच्या पट्ट्यात तापमान वाढीचा वेग जगाच्या सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. वाढत्या तापमानामुळे केवळ हिमनद्याच वितळत नाहीत, तर पर्वतांचा कणा समजला जाणारा पर्माफ्रॉस्ट कमकुवत होत आहे. यामुळे डोंगराळ भागात भूस्खलन, हिमकलन आणि अचानक पूर येण्याचा धोका वाढला आहे.




























































