
तृणमूल छात्र परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला कडक इशारा दिला आहे. तृणमूल काँग्रेसला कोणीही दाबू शकत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. पक्षाविरोधात दाखल झालेल्या १४ हजार केसेसचा संदर्भ देत, गरज पडल्यास आपण सर्वोच्च न्यायालयासोबतच आंतरराष्ट्रीय न्यायालयातही धाव घेऊ, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
बिर्ला तारांगणासमोर आयोजित या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी विद्यार्थी आणि तरुणांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केले. गरज पडल्यास तुरुंगात जा, एक महिना जेलमधले जेवण खा, पण भाजपचे जेवण खाऊ नका, असा संदेश त्यांनी दिला. भाजपकडून दाखल करण्यात आलेल्या १४ हजार केसेसबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, कल्याण बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात लढत आहेत, त्यात मी देखील लक्ष घालेन आणि वेळ आल्यास आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाईन. यामुळे केवळ सरकारच नाही, तर अटक करणारेही उघडे पडतील, असे त्या म्हणाल्या.
याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी लवकरच जिल्ह्यांचे दौरे सुरू करणार असल्याचे जाहीर केले. लोकशाहीत आंदोलनासाठी वारंवार न्यायालयाची परवानगी का घ्यावी, असा सवाल करत, जर पोलिसांनी परवानगी दिली नाही, तर आपण थेट जनतेकडून परवानगी घेऊ आणि रस्त्यावर उतरू, असेही त्या म्हणाल्या. तसेच सभेच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दी आणि वाहतूक व्यवस्थेवरून त्यांनी प्रशासनावरही ताशेरे ओढले. गद्दारांच्या रॅलीसाठी प्रशासनाने आपल्या घरासमोरील रस्ते सकाळी ९ वाजेपासून बंद केले, मात्र येथे जाणीवपूर्वक वाहने सोडून जनतेला त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.




























































