
आशिया कपमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे दोन्ही पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्यापूर्वी जेव्हा टॉस होईल तेव्हा दोन्ही कर्णधार हस्तांदोलन करणार का नाही, असा प्रश्न एका पत्रकाराने हिंदुस्थानच्या कर्णधार हरमनप्रीत कौरला विचारला होता. त्यावर हरमन संतप्त झाली खरी, पण तिने या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.
पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनासोबत हस्तांदोलन करणार का, या प्रश्नाचे हरमनप्रीतने उत्तर दिले नाही. हिंदुस्थानी कर्णधार म्हणाली की, आम्ही या आशियाई स्पर्धेकडे दबावाखाली स्वतःची चाचणी घेण्याची आणि अलीकडील अनुभवांच्या आधारावर प्रगती करण्याची संधी म्हणून पाहत आहोत.
पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणार का?
एकदिवसीय विश्वविजेता हिंदुस्थानचा महिला टी-20 आशिया कपमधील प्रमुख दावेदारांपैकी एक आहे, परंतु हरमनप्रीतने 5 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या त्यांच्या बहुप्रतीक्षित सामन्याभोवती असलेल्या चर्चांकडे फारसे लक्ष दिले नाही. जेव्हा एका पत्रकाराने हरमनप्रीत कौरला विचारले की ती पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करेल का, तेव्हा हरमनप्रीतने सांगितले की, आम्ही कोणत्याही विशिष्ट संघावर लक्ष केंद्रित करत नाही आहोत. सर्व संघ चांगली कामगिरी करत आहेत आणि आमचे लक्ष चांगले क्रिकेट खेळण्यावर आहे.
संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
हरमनप्रीत म्हणाली, एक संघ म्हणून या स्पर्धेत चांगली कामगिरी करणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत आम्ही सर्व संघांमध्ये प्रचंड सुधारणा पाहिली आहे. जेव्हाही आम्ही त्यांच्याविरुद्ध खेळतो, तेव्हा ते एक कठीण आव्हान उभे करतात. पण मला खात्री आहे की आमचा अनुभव कामी येईल. हिंदुस्थानची टी-20 विश्वचषक मोहीम निराशाजनक होती, पण हरमनप्रीतचा विश्वास आहे की मागील सामन्यांमधून मिळालेला अनुभव संघासाठी खूप फायदेशीर ठरेल.






























































