
बहीण व भावातील पवित्र नात्यांचा रक्षाबंधन सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच आज ठाण्यातील रघुवंशी हॉलमध्ये हिंदू-मुस्लिमांचे अनोखे रक्षाबंधन झाले. यानिमित्ताने शिवसेनेने १७ वर्षे हिंदू-मुस्लिमांच्या ‘ऐक्याचा धागा’ जपला आहे. शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांच्यासह शिवसैनिकांना मुस्लिम भगिनींनी राख्या बांधल्या. सुमारे ३५०हून अधिक नागरिक या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.
शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणेनगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने दरवर्षी हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिक एकत्र येत परस्परांना राखी बांधून एकता, बंधुभाव आणि विश्वासाचा संदेश देतात. आज मुस्लिम भगिनींनी हिंदू बांधवांना तर हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना राखी बांधत प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचे नाते अधिक घट्ट केले. धर्माच्या भिंती बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे रक्षाबंधन साजरे केल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, उपशहरप्रमुख व कार्यक्रमाचे आयोजक सचिन चव्हाण यांच्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बहिणींच्या सुरक्षेची जबाबदारी आपलीच
प्रत्येक धर्मातील बहिणीच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली आहे. त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक नागरिकाचे रक्षण करणे हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य आहे. विविध स्तरांवर अशा प्रकारचे उपक्रम सुरू झाले तर समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही आणि सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होईल, असे राजन विचारे यांनी सांगितले.

कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन शिवसेनेच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांनी पोलिसांना राख्या बांधल्या व औक्षण केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार व सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव, महिला पोलीस दीपाली पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शिवसेना नगरसेविका वंदना महिले, संगीता गांधी, कांचन लोंढे, यामिनी पावशे, आरती पवार, शिल्पा सोनवणे, रंजना पवार, वैशाली चांदेकर आदी महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना रक्षाबंधन केले.































































