बसेस भंगार… प्रवासी बेजार; केडीएमटीच्या नादुरुस्त बसेसमुळे हाल, मिलापनगरमध्ये दीड तास बस बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-डोंबिवली पालिकेची परिवहन सेवा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यातच बस बंद पडण्याचे प्रकार वाढले असून भंगार बसेसमुळे प्रवासी बेजार झाले आहेत. आज तर डोंबिवलीतील मिलापनगरमध्ये दीड तास बस बंद पडल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कामावर जाण्याच्या वेळेतच हा प्रकार घडल्यामुळे नोकरदारांना मनस्ताप सहन करावा लागला. सुस्थितीतील बसेस परिवहनच्या ताफ्यात कधी येणार, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.

केडीएमटीच्या बसेस सतत नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढत असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बससेवा विस्कळीत झाल्याचा फायदा रिक्षाचालक घेत असून बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना नाईलाजाने रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. शिवाय आर्थिक फटकाही बसतो. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकातून निवासी परिसराकडे जाणारी केडीएमटी बस मिलापनगर बस थांब्यावर पोहोचताच नादुरुस्त झाली. त्यामुळे चालकाने बस तेथेच उभी केली. परिणामी प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी दुसरा पर्याय शोधावा लागला.

१०० बसेस बंद

केडीएमटीच्या १३७ बसपैकी केवळ ७५ बस चालवण्यायोग्य आहेत. मात्र केवळ ४१ बसेसच धावतात. जवळपास १०० बसेस बंद असल्याने कार्यशाळेत त्या उभ्या असतात. जुजबी दुरुस्ती करून काही बस रस्त्यावर आणल्या जातात. मात्र या बसेस रस्त्यातच बंद पडतात. प्रवाशांबरोबर चालक-वाहकांनाही याचा त्रास होत आहे. उत्सवाच्या काळात बसेस नसल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.