आजपासून मराठा आरक्षणासाठी निर्णायक आंदोलन; मागण्या मान्य झाल्या नाही, तर मुंबईत जाणार, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजपासून आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी निर्णायक आंदोलन सुरू होणार आहे. ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रे मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी एकाही मराठ्याने घरात थांबू नये, आंतरवालीत यावे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले.

२८ ऑगस्टपर्यंत ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अन्यथा २९ ऑगस्टपासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, भाजपचे आमदार प्रसाद लाड, मिंधे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची शिष्टाई निष्फळ ठरली. त्यामुळे शनिवारपासून आंदोलन सुरू होणार असल्याचे मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ज्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे, ज्यांचे प्रमाणपत्र वैधतेसाठी अडले आहे अशा सर्वांनी आपापली कागदपत्रे घेऊन आंतरवालीत यावे. हे पुरावे आपण सरकारच्या तोंडावर फेकून मारू ! मात्र एकाही मराठ्याने घरी थांबू नये, हे आता शेवटचे आणि निर्णायक आंदोलन आहे, असे जरांगे म्हणाले. मागण्या मान्य झाल्या नाही तर आपण मुंबई गाठणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली.

चौका चौकात पोलीस

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ३५० पोलीस कर्मचारी, सीआरपीएफच्या सहा तुकड्या, होमगार्ड, ५५ पोलीस अधिकारी बंदोबस्तावर लावण्यात आले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

जालना जिल्ह्यात हेल्पलाइन कक्ष सुरू

मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला जालना जिल्हाधिकाऱ्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी हेल्पलाईन कक्ष सुरू केला आहे. या कक्षाच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र, पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, कागदपत्रे तसेच पुराव्यांबाबत हा कक्ष नागरिकांना मार्गदर्शन करेल, आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगेल.