
गोरगरीब रुग्णांच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालय हे अतिशय महत्त्वाचे असते. पण अलिबागच्या जिल्हा रुग्णालयातील वीज यंत्रणा सध्या व्हेंटिलेटरवर आहे. या रुग्णालयाचे विद्युत ऑडिट झाले नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे आयसीयू, ऑपरेशन थिएटर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन युनिट आदींमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल विचारला जात आहे. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतरही रायगडचे प्रशासन कुंभकर्णी झोपेत असून अलिबागच्या रुग्णालयातील सर्व अडथळे त्वरित दूर करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
शेकापच्या प्रवक्त्या चित्रालेखा पाटील यांनी अलिबाग जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली तेव्हा अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या. रुग्णालयाच्या इमारतीची विद्युत सुरक्षा वेळोवेळी राखणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था, सर्वत्र अस्वच्छता, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता अशा अनेक समस्या त्यांना दिसून आल्या आहेत. महत्त्वाच्या वैद्यकीय सेवा व उपकरणे विद्युत पुरवठ्यावर अवलंबून आहेत. आयसीयू, ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा, व्हेंटिलेटर आणि इतर जीवनावश्यक उपकरणांसाठी अखंडित आणि सुरक्षित वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा परिस्थितीत विद्युत यंत्रणेचे नियमित ऑडिटच झाले नसल्याचे समोर येणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
- रुग्णालयाच्या आवारात ठिकठिकाणी पीओपी पडलेले आढळून आले. तसेच अस्वच्छता आणि कोंदट वातावरण असल्याचे निदर्शनास आले.
- रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि दिवसरात्र सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अशा वातावरणाचा सामना करावा लागतो.
- रुग्णालयाच्या इमारतीची देखभाल, स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे नियमितपणे होणे आवश्यक असताना त्याकडे पुरेशे लक्ष दिले जात नसल्याचे लक्षात आले.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांची कमतरता
अलिबाग जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची ४२ पदे मंजूर असताना १६ पदे भरलेली असून तब्बल २६ पदे रिक्त आहेत. तर अधिपरिचारिकांच्या ९६ मंजूर पदांपैकी ५५ पदे भरलेली असून ४१ पदे रिक्त आहेत. रुग्णालयातील रुग्णसेवेचा मोठा भार याच मनुष्यबळावर असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कमालीचा ताण पडतो. रुग्णालयाचा कारभार लवकरात लवकर सुधारावा, अशी मागणी चित्रालेखा पाटील यांनी केली आहे.
—






























































