गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी रायगडाात दहा सुविधा केंद्रे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, याकरिता रायगड पोलिसांकडून मुंबई-गोवा महामार्गावर दहा ठिकाणी सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहे. ही केंद्रे खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, एमआयडीसी महाड, पोलादपूर आदी ठिकाणी असणार असून तिथे रहदारी पोलीस आणि वैद्यकीय मदत पथक तैनात राहणार आहे. वाहनांची दुरुस्ती, लहान मुलांचा आहार कक्ष आदी सुविधाही या केंद्रांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

गणेशोत्सवानिमित्त चाकरमानी मोठ्या संख्येने आपापल्या गावी परततात. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ वाढते. उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रायगड पोलीस वाहतूक विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या उत्सवासाठी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ सप्टेंबरपासून गणेशभक्त चाकरमानी कोकणातील आपल्या गावी येण्यास सुरुवात करतील. त्यामुळे ११ तारखेपासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, तसेच गणेशभक्तांना प्रवासादरम्यान समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी पोलीस दलाने जोरदार तयारी सुरू केली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यासोबत १० ठिकाणी सुविधा केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.
महामार्गावर स्थापन करण्यात येणार्या सुविधा केंद्रांत गणेशभक्तांच्या सोयीसाठी विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या ठिकाणी गणेशभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच सुविधा केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय कक्ष, पोलीस मदत कक्ष, बालक आहार कक्ष, वाहन दुरुस्ती कक्ष, एअर फिलिंग स्टेशन कार्यरत असणार आहे.