
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर भुयारी मेट्रो म्हणजेच ‘मेट्रो-३’च्या प्रशासनाने सुरक्षेसंदर्भात विविध सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार भुयारी मेट्रोमध्ये गणपतीच्या १८ इंच (दीड फूट) उंचीच्याच मूर्तींना प्रवेश दिला जाणार आहे. स्क्रीनिंग मशीनमध्ये तपासणी केल्यानंतरच बाप्पाची मूर्ती स्थानकात नेण्याची परवानगी असेल.
मुंबई मेट्रो लाईन-३ अर्थात ‘अॅक्वा लाईन’चा उपयोग गणेशभक्तांकडून गणेशमूर्तींची ने-आण करण्यासाठी केला जाऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर मेट्रो प्रशासनाने श्रद्धा आणि सुरक्षेचा विचार करून विविध सूचनांचे माहितीपत्रक भुयारी मेट्रोच्या सर्व स्थानकांच्या परिसरात लावले आहे. त्यानुसार गणपती बाप्पाच्या मूर्तीची कमाल उंची १८ इंच निश्चित करण्यात आली आहे.
गर्दी जास्त असल्यास प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रो कर्मचारी मूर्ती घेऊन जाण्यावर नियंत्रण ठेवू शकतात किंवा तात्पुरते निर्बंध घालू शकतात. तसेच, मूर्ती घेऊन प्रवास करणे ही प्रवाशाची स्वतःची जबाबदारी व जोखीम असेल, असे प्रशासनाने पत्रकात म्हटले आहे.






























































