पालिका शाळांत वाटलेल्या वह्यांमधून पानांची चोरी; पुरवठादाराला ब्लॅकलिस्ट करण्याची शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सप्टेंबर सुरू झाला तरी पालिका शाळेतील अनेक मुलांना २७ शालोपयोगी वस्तूंचे पूर्ण वाटप झालेले नाही. लवकरच सहामाही परीक्षा येईल, तरी मुलांना वह्या मिळालेल्या नाहीत. असा शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू असतानाच मुलांना देण्यात आलेल्या वह्यांमधील पानेच गायब झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ठरलेल्या संख्येपेक्षा कमी पाने असलेल्या वह्या मुलांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक वहीमागे ५ ते १२ पाने कमी असल्याचे आढळून आले आहे. वह्या पुरवठादाराने अशा प्रकारे लाखोंची चोरी केल्याची धक्कादायक बाब शिवसेनेने उघड केली आहे.

शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक व शिक्षण समिती सदस्य प्रियांक राऊत यांनी मुंबईतील काही शाळांना भेट देऊन शालोपयोगी वस्तूंची पाहणी केली. प्रभाग क्रमांक ७, दहिसर येथील तरे मार्ग मुंबई पब्लिक स्कूलमधील सातवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या वह्यांमध्ये पाने कमी आढळली. त्यामुळे या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली.

‘सनराइज प्रिंटपॅक इंडस्ट्रीज’ला पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. हे कंत्राट तीन वर्षांसाठी सुमारे २१ कोटी १८ लाखांचे आहे. “एका पानासाठी ०.१८ पैसे इतका खर्च येतो. या हिशेबाने वह्यांतून पाच पाने कमी केली तर ७५ लाखांची चोरी होते. जर १० पाने कमी असतील तर दीड कोटीची चोरी होते. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या वह्या पुरवठादारावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे.”

– प्रियांक राऊत, स्वीकृत शिक्षण समिती सदस्य