दहा थर लावताना नाकीनऊ; डीजेचा दणदणाट… वाद्यांचा घणघणाट, मुंबई, मुरबाड, खालापूर, ऐरोली आणि पुण्यात पाच मृत्यू; 168 गोविंदा जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गतवर्षी दहा थरांचा ऐतिहासिक मनोरा रचत विक्रमाची नोंद झाली असली तरी या वर्षी मात्र दहा थर लावताना गोविंदांच्या चांगलेच ‘नाकीनऊ’ आले. ठाण्यात मुंबईतील 7 आणि ठाण्यातील 4 पथकांनी नवव्या थरापर्यंत मजल मारली. मात्र दहावा थर लावता आला नाही. यातच राज्यात गोविंदा उत्सवाचा जल्लोष सुरू असताना मुंबई, मुरबाड, खालापूर, ऐरोली आणि पुण्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. मुंबईत 168 गोविंदा जखमी झाले. डीजे, लेझर लाईटस्ला बंदी असतानाही मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी डीजेचा दणदणाट आणि वाद्यांचा घणघणाट सुरू होता.

मुंबईत आज सकाळपासूनच गोविंदांच्या टोळय़ांनी हंडी फोडण्यासाठी कूच केले. मोठय़ा उत्साहात थरावर थर रचून अनेक मटक्या फोडल्या. थर रचताना मनोरे कोसळत होते. मात्र जिद्द न सोडता गोविंदा पुन्हा मनोरा रचत सलामी देत होते, लोणी मटकावत होते. संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्साह होता. मालाड मालवणी येथे दहीहंडी उत्सवादरम्यान भिंतीचा कॉलम कोसळून रुद्र कदम (7) याचा मृत्यू झाला, तर पुण्यात जुनी सांगवी येथे स्टेजचा कॉलम उतरवत असताना लोखंडी अँगल अंगावर कोसळून सलमा पठाण (45) या महिलेचा मृत्यू झाला.

विटांचा कॉलम कोसळला आणि

चिकूवाडी, मालवणी, मार्वे रोड येथील एकता वेल्फेअर सोसायटीजवळ दहीहंडीचा उत्सव सुरू होता. दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नादरम्यान विटांचा कॉलम कोसळला त्यात 7 वर्षीय रुद्र कदम याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने मालवणी जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

दहीहंडी पाहून घरी जात असताना घात!

पुण्याच्या जुनी सांगवी लेन नंबर दोन येथील विघ्नहर्ता दहीहंडी मित्र मंडळाची दहीहंडी शुक्रवारी रात्री सवा दहाच्या सुमारास फुटली. दहीहंडी पाहण्यासाठी सलाऊद्दीन पठाण व त्यांची पत्नी सलमा पठाण हे दोघे आले होते. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर सलमा या परत घरी जात होत्या. त्याचवेळी स्टेजची कमान उतरविण्याचे काम सुरू होते. यामध्ये कमानीचा लोखंडी अँगल सलमा यांच्या अंगावर पडला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.

ठाणे, पनवेल, नवी मुंबईत दणदणाट

मुंबईत डीजे आणि लेझर लायटिंगला बंदी असली तरी ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये डीजेचा दणदणाट आणि लेझर शो करून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

पुणेकर ताळ्यावर, नागपूरकरांनाही आवर

पुणे-नागपूरमध्ये पोलीस आयुक्तांनी डीजे आणि लेझर शोवर बंदी घातल्याने पुण्यात डीजेमुक्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला, तर नागपूरकरांनीही आवाजाची मर्यादा पाळल्याने पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली.

डीजेचा दणदणाट, वाद्यांचा घणघणाट

मुंबईसह राज्यातील अनेक जिह्यांमध्ये डीजे आणि लेझर लायटिंगला सरकारकडून सक्त मनाई केली असताना अनेक ठिकाणी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत डीजे दणदणाट आणि वाद्यांचा घणघणाट, लेझर शो सुरू होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरी वस्तीत 65 डेसिबलपेक्षा जास्त आवाज असू नये असा नियम आहे. मात्र अनेक ठिकाणी उल्लंघन झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी संबंधितांना सक्त ताकीद देत आवाज कमी करण्यास भाग पाडले.

खालापूरमध्ये एकजण बुडाला

दहीहंडी साजरी केल्यानंतर तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना खालापूर तालुक्यातील बीड खुर्द गावात घडली आहे. साहिल बडेकर असे या तरुणाचे नाव असून या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

मुरबाडमध्ये विजेच्या झटक्याने एकाचा मृत्यू

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले. या ठिकाणी उत्सवाची तयारी सुरू असतानाच विजेचा झटका बसून विवेक बिडवी या तरुणाचा मृत्यू झाला. यावेळी अन्य काही तरुणांनाही विजेचा धक्का बसल्याचे उपस्थितांनी सांगितले. सुदैवाने त्यांचा जीव वाचला. विवेकच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ऐरोलीत 34 वर्षीय गोविंदाचा मृत्यू

थरांवर थर रचत असतानाच ऐरोलीत दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले. ऐरोलीतील देविदास चौगुले दहिहंडी मंडळातील 34 वर्षीय गोविंदाचा थर कोसळल्यामुळे मृत्यू झाला. स्वप्नील नावर असे त्या गोविंदाचे नाव असून, तो घणसोली येथे राहतो.