बघा सरन्यायाधीश काय म्हणतात… न्याय वेळेतच मिळायला हवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘न्यायव्यवस्था ही लोड बेअरिंग भिंतीसारखी असते. ती प्रत्यक्ष दिसत नसली तरी संपूर्ण इमारत त्यावर उभी असते असे सांगतानाच, न्याय वेळेतच मिळायला हवा आणि तो विश्वासार्ह वाटायला हवा,’ असे मत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी आज व्यक्त केले.

‘ब्रिक्स चीफ जस्टिस फोरम’मध्ये ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी देशाच्या विकासातील न्यायव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. ‘व्यावसायिक वाद किती सुरळीतपणे आणि निष्पक्षपणे सोडवले जातात यावर विदेशी गुंतवणूकदारांची भूमिका अवलंबून असते. ज्या देशात न्यायालये झटपट, पारदर्शक आणि जगाला विश्वासार्ह वाटेल असे न्यायदान करतात, त्या देशाच्या विकासातील अनेक अडथळे आपोआप दूर होतात, असे सूर्य कांत म्हणाले.

‘ब्रिक्स’ हे आधुनिक नालंदा विद्यापीठ व्हावे!

‘नालंदा विद्यापीठ हे एकेकाळी बुद्धिवाद्यांचे केंद्र होते. जगभरातील विद्यार्थी व संशोधक येथे येत. वादविवाद होत. ‘ब्रिक्स’ परिषद ती परंपरा पुढे नेऊ शकते. ‘ब्रिक्स’ची ओळख जिवंत नालंदा विद्यापीठ अशी हवी, असे सूर्य कांत म्हणाले.

मध्यस्थीचा मार्ग प्रभावी ठरू शकतो!

आंतरराष्ट्रीय व्यावसायिक वाद सोडवणे सुलभ व्हावे म्हणून ‘ब्रिक्स’ देश आणि भागीदार देशांमध्ये मध्यस्थीसाठी एक सामायिक व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रस्ताव सूर्य कांत यांनी मांडला. ‘न्यायदानातील दिरंगाई टाळण्यासाठी व खटल्यांचा वेगाने निपटारा होण्यासाठी केवळ न्यायालयीन लढाईवर अवलंबून राहण्यापेक्षा मध्यस्थाची मदत हा प्रभावी मार्ग ठरू शकतो. मध्यस्थी म्हणजे तडजोड नसून दोन्ही पक्षांना मान्य होणारा मध्यममार्ग असतो,’ असे सूर्य कांत म्हणाले.