अखेर सुभाष चंद्रांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

22 हजार कोटी रुपयांचे कर्ज 6 कोटी रुपयांमध्ये सेटल करण्यास स्थगिती मिळाल्यानंतर झी समूहाचे संस्थापक सुभाष चंद्रा यांना आणखी एक दणका बसला आहे. स्वतःच्या कंपन्यांची बनावट नेटवर्थ दाखवून 1,322 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने सुभाष चंद्रा यांच्यावर अखेर गुन्हा दाखल केला आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने दाखल केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे.

सीबीआयच्या बँकिंग सिक्युरिटीज फ्रॉड शाखेने 31 ऑगस्ट रोजी ही कारवाई केली आहे. 22 हजार कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी सुभाष चंद्रा यांनी वैयक्तिक हमी दिली होती. त्यापैकीच हे प्रकरण आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सुभाष चंद्रा यांच्याव्यतिरिक्त वसंत सागर प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संचालक पंकज सुरोलिया, पॅन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, डिजिटल सबस्क्रायबर मॅनेजमेंट अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा. लि. आणि तिचे संचालक अमिश पंडया, स्पिरिट इन्फ्रा पॉवर अँड मल्टी व्हेंचर्स प्रा. लि. आणि तिचे संचालक राजीव ढोलकिया यांचा समावेश आहे. याशिवाय काही अज्ञात सरकारी अधिकारी आणि इतरांविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला.

कर्जासाठी 59 हजार कोटींचे नेटवर्थ दाखवले

सुभाष चंद्रा यांनी एलआयसी हाऊसिंग फायनान्सकडे नेटवर्थ प्रमाणपत्र जमा केले होते. त्यानुसार त्यांनी स्वतःची नेटवर्थ 59,113 कोटी रुपये दाखवली होती. याआधारेच त्यांना कर्ज मंजूर झाले होते. दिवाळखोरी कारवाई सुरू झाली त्यावेळी त्यांची खरी नेटवर्थ उघड झाली. 2024मध्ये त्यांची नेटवर्थ 31.79 कोटी एवढीच होती, तर 2017-18 मध्ये त्यांची संपत्ती 40 हजार कोटींपेक्षा जास्त नव्हती, याची कबुली त्यांनीच दिली होती.