
महापालिकेच्या नियोजन विभागांतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या मार्गदर्शनाखाली यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘मोदक महोत्सव 2026’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत महिला बचत गटांकडून तयार करण्यात येणारे उकडीचे आणि तळलेले मोदक मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत. यासाठी महिला बचत गटांना अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या सहकार्याने अन्नसुरक्षेबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पालिका आणि एफडीएने संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मोदक बनवताना घ्यावयची स्वच्छता, अन्नसुरक्षा, अन्न हाताळणी, कच्च्या मालाची गुणवत्ता आणि पॅकिंग याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणानुसार महिला बचत गटांनी अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करून मोदक बनवायला सुरुवात केली आहे. या उपक्रमातून महिला बचत गटांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळण्यासोबतच मुंबईकरांना सुरक्षित आणि दर्जेदार मोदक उपलब्ध करून देण्याचा दुहेरी उद्देश साध्य होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.





























































