
बिहारच्या जमुई जिह्यात एका टोळक्याने शाळकरी मुलाला व मुलीला रस्त्यावर अडवून केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत राज्यातील भाजप सरकारवर हल्ला चबिहारच्या रस्त्यांवर महिला सुरक्षित का नाहीत, असा सवाल त्यांनी केला.
जमुईच्या सोनाई मडवा परिसरात शनिवारी रात्री कोचिंग क्लासमधून परतणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या एका मुलाला व मुलीला टोळक्याने जबरदस्तीने अडवले. त्यांचा छळ केला, त्यांना अपमानित केले. मुलीवर हल्ला केला. मुलीने हात जोडून सुटकेसाठी विनवणी केली, पण गुंडांनी तिच्याशी असभ्य वर्तन सुरूच ठेवले. तिला धक्काबुक्की केली. याच टोळक्यातील काही जणांनी हा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. त्यावरून राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर संतप्त प्रतिक्रिया दिली.
बिहारमधील जमुई येथील एक व्हिडीओ अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. या लोकांना इतके असभ्यपणे वागण्याचा अधिकार कोणी दिला? ही संस्कृती नसून पितृसत्ताक मानसिकता आहे. मुलीच्या शरीरावर, तिच्या निर्णयांवर आणि आवडीनिवडींवर पुरुषाचे नियंत्रण असले पाहिजे असा हा विचार आहे, असे राहुल म्हणाले.
बिहार सरकारने उत्तर द्यावे!
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या प्रत्येकाची ओळख पटवली पाहिजे. गुन्हेगारांवर पोक्सो कायद्यांतर्गत खटला चालवून त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ही घटना 19 सप्टेंबर रोजी घडली असेल, तर गुन्हेगार अद्यापही गजाआड का झाले नाहीत? संध्याकाळी सात वाजताही बिहारच्या रस्त्यांवर मुलगी सुरक्षित का नसते? याचे उत्तर बिहार सरकारने द्यावे, असेही राहुल म्हणाले.
दुसऱ्यांवर सत्ता गाजवणं हीच संस्कृती आहे आणि त्यात गैर काहीच नाही असं जेव्हा अंधभक्त मानतात, तसा लोकांचा समज करून देतात तेव्हा जमाव स्वतःलाच कायदा समजू लागतो.





























































