
मोबाईल यूजर्ससाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रायच्या नव्या निर्णयामुळे केवळ व्हाइस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा असलेले आणि कोणताही डेटा नसलेले रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देणे सर्व दूरसंचार कंपन्यांना आता बंधनकारक असणार आहे.
सध्या अशा प्रकारचे प्लॅन खूपच कमी आहेत. तसेच त्यात कमी वैधता असलेल्या प्लॅनमध्ये केवळ कॉलिंग व एसएमएसची सुविधा मिळते. देशातील लाखो ग्राहकांना डेटाची गरज नसताना कंपन्या डेटाचा पैसा ग्राहकांच्या माथी मारतात. ज्यांना डेटाची गरज नाही, अशा ग्राहकांना केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे प्लॅन उपलब्ध करून देण्याची कंपन्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे ट्रायने नवीन नियम आणला आहे. नव्या नियमांनुसार, ज्या ग्राहकांना 30 दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधतेचा रिचार्ज प्लॅन हवा आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक दूरसंचार कंपनीला व्हाइस आणि एसएमएस सुविधा असलेले प्लॅन उपलब्ध करून द्यावे लागतील.



























































