अनंत नाग यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव; राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातमधील एकता नगर येथे पार पडला. या सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील बहुमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

1954 पासून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नवी दिल्लीत होत आहे. अनेक दशकांची परंपरा मोडीत काढत यंदा पहिल्यांदाच हा सोहळा गुजरातमध्ये पार पडला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जुलैमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली होती. या सोहळ्यात ‘आर्टिकल 370’ मधील अभिनयासाठी यामी गौतम हिला सर्वेत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘ब्रह्मयुगम’साठी ममुटी आणि ‘चंदू चॅम्पियन’साठी कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात आला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘आर्टिकल 370’ने पटकावला. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ला सर्वेत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळाला. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार ‘घरत गणपती’ चित्रपटातील ‘नवसाची गौराई माझी’ या गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना तर ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी योगेश देशपांडे यांना गौरविण्यात आले.

गेल्या वर्षी मला ‘पद्मभूषण’ पुरस्कार मिळाला होता आणि आता चित्रपटसृष्टीतील हा सर्वोच्च पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद होतोय. हा पुरस्कार केवळ माझ्यासाठी नाही; तो प्रत्येक निर्माता, दिग्दर्शक, संवाद लेखक, गीतकार, मेकअप आर्टिस्ट, सहाय्यक दिग्दर्शक यांच्यासाठी आहे. तसेच हा पुरस्कार त्या लाखो लोकांसाठी आहे ज्यांनी मला त्यांच्या हृदयात स्थान दिले आहे.

अनंत नाग, अभिनेते