
अहिल्यानगर येथील बहुचर्चित धीरज परदेशी हत्या प्रकरणातील पाचही आरोपींचे जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. कोर्ट क्र. 1चे न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांनी हा निर्णय दिला आहे.
धीरज परदेशी यांची 7 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी मुकुंदनगर येथील दर्गा दायरा कब्रस्तानजवळ हत्या करण्यात आली होती. फिर्यादी अक्षय मुळे, धीरज परदेशी व काव्य गणेश तावरे हे स्ट्रीट लाइट पॅनेल्सचे काम करत असताना आरोपी मेहराज सय्यद, सिराज सय्यद, मुस्तकीन सय्यद, युनूस शेख व इतर दोन-तीन अनोळखी इसमांनी बेकायदेशीर जमाव जमवून धीरज परदेशी यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांचा उपचारांदरम्यान 9 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता.
याप्रकरणी पोलिसांनी तपासादरम्यान युनूस खानसाहेब शेख, वसीम रहिम सय्यद, इम्रान मुसा सय्यद, अरमान लियाकत सय्यद, मोहम्मद इर्शाद इम्रान सय्यद यांच्यासह नऊ आरोपींची नावे निष्पन्न केली होती. या आरोपींनी न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी होताना सरकारी पक्षाच्या वतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ही घटना घडवून आणण्यासाठी आरोपींनी पूर्वनियोजित कट रचला होता आणि या प्रकरणाचा तपास अजून प्राथमिक स्तरावर असून, आरोपींची ओळख परेड होणे बाकी आहे. यासह विविध मुद्दय़ांवर सरकारी पक्षाने युक्तिवाद मांडला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींचे नियमित जामीन अर्ज
फेटाळून लावले.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ऍड. पुष्पा कापसे-गायके यांनी काम पाहिले. त्यांना ऍड. सुहास टोणे, ऍड. सागर टाक, ऍड. अमित गाडेकर यांनी सहकार्य केले.


























































