
>> अशोक शिंदे
मागच्या वर्षी अतिवृष्टीने हाहाकार उडवला, हातातोंडाशी आलेले पीक महापुरात वाहून गेले. यंदा पावसाने शेतकऱ्यांना रडवले आहे. ‘पावसाअभावी सगळा खरीप वाळून गेला आहे. पाहणी, पंचनामे आणि आश्वासनांची नाटके बंद करून प्रत्यक्ष मदत कधी देता ऐवढेच बोला असा आक्रोश शिवारातून ऐकायला येत आहे.
धाराशिव जिल्हा तसा दुष्काळीच, पण गेल्या वर्षी पावसाने इतिहास घडवला. असा पाऊस पडला की वर्षानुवर्षे मृत असलेल्या नद्याही जिवंत झाल्या. महापुराची मगरमिठी अशी पडली की शिवारच खरवडून गेले. कोणतेही पीक हाती लागले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्ध्वस्त शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे ऐतिहासिक पॅकेज जाहीर केले. परंतु या पॅकेजमधील खडकूही अद्याप मिळालेला नाही. सरकारी मदतीची आशा सोडून देत शेतकऱ्यांनी यंदा उधार उसनवार करून खरिपाची मशागत केली. सुरुवातीला पावसानेही आधार दिला. परंतु जवळपास दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने कसेबसे तगलेले सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद जागेवरच खुरटले. त्यात उन्हाचा तडाखा बसल्याने ही पिके आता वाळून गेली असून पेरणीचा सर्व खर्च वाया गेला आहे.
७१ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पाचोळा
कळंब तालुक्यात इटकूर, मस्सा, येरमाळा, मोहा, शिराढोण, नायगाव अशा आठ मंडळात मिळून जवळपास ७१ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. जून ते सप्टेंबर या १०७ दिवसांच्या काळात केवळ २५ दिवस पाऊस पडला. पावसाच्या प्रदीर्घ खंडाने खरीप हंगाम पूर्णतः उद्ध्वस्त केला आहे. याचा थेट फटका पाऊण लाख शेतकऱ्यांना बसला आहे. कळंबचे अर्थकारण सोयाबीनच्या अवतीभोवती फिरते. दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे हे अर्थकारण ठप्प झाले आहे
घोषणा नको, थेट मदतीचे बोला
मेटाकुटीला आला आहे, त्याच्याभोवती कर्जाचा विळखा अधिक घट्ट झाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची मदत अजूनही मिळालेली नाही. आताही पाहणी, पंचनाम्यांचे नाटक सुरू झाले आहे. त्यानंतर अहवाल दिला जाईल, नंतर मदतीची घोषणा होऊन प्रत्यक्ष मदत हाती केव्हा पडेल याची काहीही शाश्वती नाही. तेव्हा थेट आर्थिक मदत केव्हा देणार हे सांगा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.





























































