
>> अभय मिरजकर
दुष्काळाच्या भयाण झळांनी लातूरचे शिवार अक्षरशः करपून गेले आहे! दोन महिने झाले, पावसाचा थेंबही पडला नाही, आता जमिनीतील ओलही संपली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणीही सुकले आहे! सोयाबीन उत्पादनात लातूर जिल्हा देशात क्रमांक दोगचा, पण यंदा जेवडे पेरले तेवढेही सोयाबीन उगवले नाही. पावसाअभावी खरीप तर हातचा गेलाच आहे. पण रब्बीची आशाही मावळल्याने जगायचे कसे, अशी भ्रांत शेतकऱ्यांना पडली आहे.
लातूर जिल्हयाचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी ७०६ मिमी आहे. यावर्षी आजपर्यंत फक्त ३१३.९ मिमी म्हणजेच केवळ ४४ टक्के पाऊस झाला आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत पावसाचा खंड हा जवळपास दोन महिन्यांचा आहे. त्यामुळे सुरुवातीच्या पावसावर जमिनीच्या वरचा स्तर ओलावला होता. या ओलीच्या आधारावर सोयाबीन, कापूस, तुरीसह इतर खरीप पिकांनी कशीबशी तग धरली, परंतु गेल्या आठ दिवसांपासून आकाशातून सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे जमिनीतली ओलही शुष्क झाली आहे.
वाळलेली पिके, भेगाळलेली जमीन… लातूर जिल्हयाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ७.१५ लाख हेक्टर असून, त्यापैकी ६.६५ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. सरकारच्याच माहितीनुसार ५.८६ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड होते. यापैकी ९० टक्के क्षेत्र हे सोयाबीनने व्यापलेले आहे. पाऊसच नसल्यामुळे सोयाबीन, तूर, उडीद, मूग वाळून गेली आहेत. जमिनीतली ओल संपल्यामुळे तीही आता भेगाळली आहे. निदान रब्बी तरी हाती लागावा, या भाबड्या आशेपोटी शेतकऱ्यांनी वाळलेली पिके उपटून टाकायला सुरुवात केली आहे.
चाऱ्याअभावी जनावरे बाजाराच्या वाटेला
पाऊसच नसल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मृगात झालेल्या पावसावर खुरटे गवत उगवले होते. पण उन्हाच्या चटक्याने हे गवतही वाळून गेले आहे. खरिपाच्या पिकाची काढणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चारा उपलब्ध होतो. परंतु यंदा ती देखील शक्यता मावळली आहे. त्यामुळे चारापाण्याअभावी उमदी जनावरे बाजारात विक्रीला येत आहेत.
पिण्याच्या येण्याच्या पाण्याची चिंता
दर तीन वर्षांनी लातूरकर दुष्काळाचा अनुभव घेत असतात, कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी असे दुष्काळाचे रूपही पाहण्यात आले. गेल्या दशकात बेट रेल्वेने पाणी आणण्याचा काळाकुट्ट इतिहासही लातूरकरांच्या माथी बसला आहे. गेल्या वर्षी हातातोंडाशी आलेले सोयाबीन मुसळधार पावारात वाहून गेले. यंदा पावसाचा घेवही पडला नाही. त्यामुळे जिल्हयातील सर्व लहानमोठे प्रकल्प तळाशीच आहे, पाणीच नसल्यामुळे पुढील वर्ष कसे काढायचे, असा प्रश्न आहे.


























































