दहावीत 100 टक्के गुण मिळूनही बहिणीला प्रवेश नाही; भावाने जीवन संपवले, बीड जिल्ह्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावीत पैकीच्या पैकी गुण मिळूनही केवळ आरक्षणाअभावी लातुरातील राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने आलेल्या वैफल्यातून भावाने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील सृष्टी नितीन बोबडे हिला दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळाले. या गुणवत्तेच्या आधारावर अकरावीसाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल अशी अपेक्षा बोबडे कुटुंबाला होती. त्यासाठी त्यांनी लातुरातील राजर्षि शाहू महाविद्यालयात प्रवेश अर्जही दाखल केला होता. परंतु मराठा आरक्षणाच्या अभावी सृष्टीला प्रवेश मिळू शकला नाही.

एवढी गुणवत्ता असूनही तिला हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याची बोच भाऊ आकाश (१६) याच्या मनाला लागली. ‘केवळ मराठा आरक्षण नसल्यामुळे गुणवत्ता असूनही सृष्टीला प्रवेश मिळाला नाही’ हे वैफल्य त्याने वडिलांजवळ बोलून दाखवले. त्यानंतर खचलेल्या आकाशने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे बोबडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.