
शहापूर तालुक्यातील खर्डी उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह तयार करण्यात आले आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील गोरगरीब, आदिवासी गरजू रुग्ण, गर्भवती महिलांचा शहापूर-ठाण्याचा मोठा फेरा वाचणार आहे. तसेच रुग्णालयात विशेष भूलतज्ज्ञही उपलब्ध असल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
खर्डी उपजिल्हा रुग्णालयात दर बुधवारी आणि गुरुवारी सिझेरियन शस्त्रक्रिया तसेच सुरक्षित वैद्यकीय गर्भपाताची सुविधा सुरू करण्यात आली असल्याचे खर्डी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशीलक शिंदे यांनी सांगितले. या सुविधेचा लाभ गरजू रुग्णांनी घेण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. ठाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी खर्डी रुग्णालयात होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी विशेष भूलतज्ज्ञ उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले. त्यामुळे यापुढे प्रसूतीसाठी महिलांना खासगी दवाखान्यात किंवा ठाणे, शहापूर येथील शासकीय दवाखान्यात धाव घ्यावी लागणार नाही. याचसोबत दर गुरुवारी हर्निया, अपेनडिक्स, हायड्रोसले व शरीरावरील छोट्या गाठी यांसारख्या शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ शल्यचिकित्सक उपलब्ध होणार आहे.
“खर्डी ग्रामीण रुग्णालयात सुसज्ज शस्त्रक्रिया गृह सुरू झाले आहे. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांनी दोन दिवस अगोदर रुग्णालयात येऊन मेडिकल चेकअप व रक्ताच्या आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात. खर्डी परिसरातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.”
आशीलक शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, खर्डी.





























































