उज्जैनमध्ये मशीद पाडण्यावरून तुफान राडा! बुलडोझर कारवाईविरोधात दगडफेक, गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार, 7 जणांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील अब्दालपुरा भागात असलेल्या मशिदीवर बुलडोझर कारवाई करण्यात आली. या कारवाईवर मुस्लिम समुदायातील एका गटाने सहमती दर्शवली तर दुसऱया गटाने विरोध केल्याने या ठिकाणी सोमवारी जोरदार राडा पाहायला मिळाला. मशिदीवर कारवाई होताच एका गटाने पोलिसांवर तुफान दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला तसेच अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या. पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे अब्दालपुरा भागात मोठा तणाव पाहायला मिळत आहे.

उज्जैनमध्ये 2028मध्ये महाकुंभमेळा होणार असल्याने आतापासूनच यासाठी तयारी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात काही कामे केली जात आहेत. शहरातल्या काही इमारती तोडण्यात आल्या आहेत. याच विकास कामांच्या अनुषंगाने मशिदीचा एक भाग पाडण्यात येणार होता. मात्र रविवारी रात्रीपासूनच बुलडोझर कारवाईला विरोध दर्शवत या ठिकाणी लोकांचा जमाव जमला. सोमवारी सकाळी प्रशासनाचे लोक तोडक कारवाईसाठी आले असता या ठिकाणी वाद वाढला. पोलिसांनी कारवाई सुरू करताच जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. ज्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला तसेच अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या.

15 धार्मिक स्थळांपैकी 12 हटवली

कुंभमेळय़ासाठी आतापासून जी तयारी केली जात आहे त्यात जवळपास 15 धार्मिक स्थळे हटवली जाणार आहेत. सध्या यातील 12 धार्मिक स्थळे हटवण्यात आली आहेत. उज्जैनमधील कांतल चौक ते गोपाल मंदिरापर्यंतचा 1.5 किलोमीटरचा रस्ता 15 मीटरपर्यंत रुंद केला जाईल. यासाठी 15 धार्मिक स्थळांसह 323 घरे पाडण्यात येतील. आतापर्यंत 12 धार्मिक स्थळे हटवण्यात आली आहेत. शाही मशिदीचा सुमारे 9 फूट लांब आणि 4 फूट रुंद असलेला एक भाग रस्त्याच्या परिमितीत येतो. कागदपत्रांनुसार ही मशीद 100 वर्षांहून अधिक जुनी आहे. मात्र इमामांच्या दाव्यानुसार मशीद 600 वर्षांहून अधिक जुनी आहे.

2 हजार पोलीस तैणात

मशिदीच्या 500 मीटरच्या भागात चारही बाजूंनी 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॅरिकेडिंगही लावण्यात आले आहे. ज्या लोकांनी तोडक कारवाईच्या विरोधात आंदोलन केले त्यामध्ये महिलांचाही समावेश होता. रविवारी रात्रीपासून तणाव कायम आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बंदोबस्त वाढवला आहे.

हायकोर्टाने याचिका फेटाळली

उज्जैनमधील शाही मशीद प्रकरणात दाखल केलेली याचिका मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शाही मशीद समितीचे प्रतिनिधित्व करणारे वकील पुलदीप पाठक यांनी ही याचिका दाखल केली होती. समिती आणि प्रशासन यांच्यातील करारानुसार रस्त्यावर 3 फूट जागा सोडून काही दुकाने हटवण्यास सहमती झाली आहे. मोठी मिनार स्थलांतरित केला जाईल आणि दुकानांसाठी दुसरी जागा दिली जाईल. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि शाही मशीद समिती यांच्यात झालेल्या करारानुसार न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढले.