
देशातील निवडणूक घोटाळय़ाचे सूत्रधार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी शिवसेना व मनसेने जनमोर्चाची घोषणा केली आहे. येत्या रविवारी मुंबईत हा महामोर्चा निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवार, 29 सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ पोस्ट करून आज ही माहिती दिली. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी सकाळी 11.30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. ठाकरे बंधू या वेळी काय भूमिका मांडणार याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.
निवडणूक आयोगातील बंडाळीनंतर देशातील मतचोरीवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब झाले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या भ्रष्ट कारभाराचे बिंग फुटले आहे. ज्ञानेश कुमार हे भाजपसाठीच काम करतात, असा गौप्यस्फोट केरळच्या माजी मुख्य सचिवांनी केला आहे. त्यामुळे ज्ञानेश यांच्याविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. त्यांना पदावरून हाकलण्याची मागणी होत आहे. शिवसेना व मनसेने या मागणीला पाठिंबा देत आंदोलनाची हाक दिली आहे. ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.
स्थळ – शिवतीर्थ निवासस्थान
वेळ – सकाळी 11.30 वाजता
























































