एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, आदित्य ठाकरे यांनी केली होती मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 3 ऑक्टोबरपासून घेण्यात येणाऱया सर्व स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याबाबत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याकडे मागणी केली होती. परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांचे आभार मानले. तसेच आयोगाच्या प्रमुखांचा राजीनामाही तत्काळ घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 3 ऑक्टोबरपासून घेण्यात येणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा – 2026, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा – 2026 आणि महाराष्ट्र गट – ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा – 2026 या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेच्या सुधारित तारखांबाबत स्वत्रंपणे कळविण्यात येतील, असे आयोगाने म्हटले आहे.

अनेक विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी आयोगाकडे राज्य सेवा मुख्य परीक्षा – 2025मधील मूल्यांकनाबाबत आक्षेप नोंदविलेले आहेत. हे आक्षेप विचारात घेऊन राज्य सेवा मुख्य परीक्षा – 2025च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आयोगाच्या प्रमुखांचा राजीनामा घ्या – आदित्य ठाकरे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा व शासकीय भरती प्रक्रियेसंदर्भात निर्माण झालेल्या गंभीर समस्या तसेच आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत परीक्षार्थीमध्ये निर्माण झालेल्या विविध प्रश्नांबाबत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 11 सप्टेंबरला राज्यपालांची भेट घेऊन परीक्षार्थींच्या समस्या व तक्रारी निदर्शनास आणून दिल्या होत्या. तसेच या गोंधळाला एमपीएससी बोर्डाचे अध्यक्ष पूर्णपणे जबाबदार असल्याने त्यांचाच राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

25 सप्टेंबर रोजी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना परीक्षार्थींच्या मागण्यांबाबत पुन्हा निवेदन दिले होते. व्ही. राधा समितीचा अहवाल आल्यावर त्याची योग्य अंमलबजावणी होईपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, त्याचप्रमाणे परीक्षा पुढे गेल्यामुळे ज्या परीक्षार्थ्यांचे नुकसान होणार आहे त्यांना वयाबाबत सवलत देण्यात यावी. या परीक्षार्थींच्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्यांच्या हिताचे योग्य निर्णय घेण्यात यावेत, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे या निवेदनाद्वारे केली होती.