ठाण्यातील शिंदे गटाच्या यूट्यूबर ‘भाई’ला महिलांचा पोलीस ठाण्यात चोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या कपड्यांचा व्यवसाय करणाऱया महिलांकडे प्रत्येकी पाचशे रुपयांचा हप्ता मागणाऱ्या शिंदे गटाच्या यूट्यूबर ‘भाई’ला महिलांनी पोलीस ठाण्यातच फटकावले. सिद्धू अभंगे असे त्याचे नाव असून सिद्धू याची कोपरी परिसरात प्रचंड दहशत आहे. त्याच्यावर खंडणी, हत्येचा प्रयत्न, धमकावणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ठाण्याच्या कोपरी भागात गोरगरीब महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी जुन्या कपडय़ांचा व्यवसाय सुरू करून दिला होता. या व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. शिंदे गटाचा पदाधिकारी असलेल्या सिद्धू अभंगे याने तेथील महिलांनाच धमकावत खंडणी मागितली. रविवारी रात्री तर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. जुन्या कपडय़ांचा व्यवसाय करणाऱया महिलांकडे त्याने प्रत्येकी पाचशे रुपयांची मागणी केली.

सिद्धूच्या या धमक्यांना भीक न घालता कोपरीतील कापड विव्रेत्या महिला त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी कोपरी पोलीस ठाण्यात एकत्र आल्या. त्याचवेळी सिद्धूदेखील तेथे पोहोचला. तो आल्याचे दिसताच महिलांच्या संतापाचा स्फोट झाला आणि पोलिसांसमोरच त्याला बेदम बदडले. या आक्रमक महिलांच्या तावडीतून युटय़ूबरची सोडवणूक पोलिसांनीच केली.

पोलीस आयुक्तालयावर धडक

कोपरी पोलिसांनी सिद्धूवर कारवाई न केल्याने कपडा विव्रेत्या महिलांनी हातात फलक घेत थेट पोलीस आयुक्तालयावर धडक दिली. खंडणीखोर युटय़ूबरला अटक करा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणीही या महिलांनी केली.