अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला सक्तमजुरी, माणगाव विशेष न्यायालयाचा निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आत्महत्येची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला माणगाव विशेष न्यायालयाने १० वर्षांची सक्तमजुरी सुनावली आहे. नीलेश दुर्गवले असे नराधमाचे नाव आहे. हा प्रकार २०२२ साली म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता.

पीडित अल्पवयीन मुलीला नीलेश दुर्गवले याने ‘तू भेटायला आली नाहीस तर मी आत्महत्या करीन,’ अशी धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. यापूर्वीदेखील आरोपीने पीडितेवर अत्याचार केल्याचे तपासात समोर आले होते. याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात नीलेश याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी, म्हसळा पोलीस ठाण्याचे वाय. पी. बांडे यांनी केला.

नुकसान भरपाईचे आदेश

तपास पूर्ण झाल्यानंतर याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तर हा खटला माणगाव विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम. के. पाटील यांच्यासमोर आल्यावर सरकारी वकील योगेश तेंडुलकर यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून आरोपीला दोषी ठरवले. नराधमाला १० वर्षांची सक्तमजुरी, ५ हजारांचा दंड ठोठावला. तसेच पीडित मुलीला ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.