
तुरीच्या दाट पिकाचा आडोसा घेत गांजाची लागवड केल्याचा प्रकार पांढरकवडा तालुक्यातील धरणपोड-करंजी शिवारात उघडकीस आला. पांढरकवडा पोलिसांनी कारवाई करीत गांजाची तब्बल १६० झाडे जप्त केली. या कारवाईत एकूण ३ लाख ६४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
धरणपोड-करंजी येथील शालिक बापूराव मेश्राम (५५) यांच्या शेतात गांजाची लागवड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी पंच व वजन-मापन अधिकाऱ्यांसह शेतगट क्रमांक ९५ मध्ये पाहणी केली. यावेळी तुरीच्या पिकामध्ये गांजाची १६० झाडे आढळून आली.
तुरीची उंच वाढ आणि दाट पिकामुळे त्यामध्ये गांजाची झाडे सहज नजरेस पडत नसल्याचे कारवाईत समोर आले. तुरीच्या पिकात मिसळून गांजाची लागवड करण्यात आली होती. पोलिसांनी सर्व १६० झाडे जप्त करून त्यांचे वजन-मापन केले. या प्रकरणी शालिक मेश्राम याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सहायक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरकवडा पोलिसांनी केली.
शेतीतून मिळणारे उत्पन्न अनिश्चित असताना वाढता उत्पादन खर्च, पिकांचे नुकसान आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट कायम आहे. मात्र, आर्थिक अडचणी असल्या तरी बेकायदेशीर मार्ग स्वीकारण्याचे समर्थन होऊ शकत नाही. अशा घटनांच्या मुळाशी असलेली आर्थिक अस्थिरता आणि अतिरिक्त उत्पन्नाच्या शोधाची मानसिकता यावरही गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. कायद्याची कठोर अंमलबजावणी करतानाच शेतकऱ्यांना शेतीतून स्थिर आणि कायदेशीर उत्पन्न मिळण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.


























































