ग्यानू मस्ट गो! दीपकेंची पोस्ट… कॉक्रोचचा शुक्रवारी मुंबईत ‘जेल भरो’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील निवडणूक घोटाळय़ाचे कथित सूत्रधार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टी शुक्रवार, 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत ‘जेल भरो’ आंदोलन करणार आहे. सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’वर यासंदर्भात पोस्ट करत ‘चलो मुंबई’ असे आवाहन केले आहे. ‘ग्यानू मस्ट गो…’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

एसआयआर प्रक्रिया राबवताना ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या मनमानीवर आयोगातील दोन आयुक्तांनीच आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे सीजेपीकडून ‘ज्ञानेश कुमार हटाव’ अशी मागणी करीत छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आंदोलन पुकारले आहे. मुंबई पोलिसांनी ध्वनी प्रदूषण आणि वाहतूक कोंडीचे कारण देत या आंदोलनास परवानगी नाकारली आहे. त्यानंतरही सीजेपी आंदोलनावर ठाम आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मानले आभार

सीजेपीच्या मुंबईतील आंदोलनाला शिवसेना व मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे. त्याबद्दल दीपके यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

आता बस्स झालं भावा!

दीपके यांनी पोस्ट करून आंदोलनाचे स्थळ आणि वेळ जाहीर केली आहे. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता हे आंदोलन होणार आहे. दीपकेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची छबी असलेला एक फोटो शेअर केला आहे. त्यात तरुणांचे प्रतिनिधी म्हणून अनेक कॉक्रोचेस दाखवण्यात आले आहेत. ‘ग्यानू, आता बस्स झालं भावा!’ असे त्या फोटोवर नमूद करण्यात आले आहे.