
राजकीय गटबाजी आणि व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी माणगाव नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत तब्बल १८३ कोटी रुपयांचे ठराव शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी नामंजूर केले. १५८ कोटींची एसटीपी योजना बासनात गुंडाळली आहे. शिवाय २५ कोटींचा घनकचरा प्रकल्पही बारगळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नगरपंचायतीत १७पैकी महायुतीचे १६ सदस्य असतानाही विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या योजना सत्तारूढ शिंदे गट आणि अजित पवार गटच रोखत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
माणगाव शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यासाठी १५८ कोटी रुपयांची एसटीपी व भुयारी गटार योजना प्रस्तावित करण्यात आली होती. या योजनेसंदर्भातील ठराव २७ ऑगस्ट रोजी झालेल्या नगरपंचायतीच्या विशेष सभेत मांडण्यात आला होता. मात्र या ठरावावर मतदान न घेता नगरसेवकांनी त्याला विरोध दर्शविल्याने हा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही. तसेच शहरातील कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी २५ कोटी रुपयांची योजना प्रस्तावित करण्यात आली होती. या योजनेचा ठरावही सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. मात्र हा विषयही बहुमताने नामंजूर करण्यात आला.
शहरातील सांडपाणी, भुयारी गटार आणि घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दीर्घकालीन दृष्टीने सोडवणे गरजेचे असताना हे ठराव नामंजूर होण्यामागे ‘अर्थकारण’ दडले असल्याची शहरात उघड चर्चा आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा, पर्यावरणीय परिणाम आणि शहराच्या भविष्यातील वाढीचा विचार यावर सर्वसाधारण सभेत चर्चाच होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
कुरघोडीचे राजकारण
माणगाव नगरपंचायतीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १, भाजप २, शिंदे गट २ आणि अजित पवार गटाचे १२ सदस्य आहेत. महायुतीच्या नगरसेवकांची संख्या १६ आहे. केंद्रात, राज्यात आणि माणगाव नगर परिषदेत महायुतीची सत्ता असतानाही नगरसेवकांच्या सोयीच्या भूमिका, बदलत्या राजकीय मतभेदांचा परिणाम शहराच्या विकासकामांवर होत असल्याने माणगावकरांमध्ये नाराजी आहे. एसटीपी आणि घनकचरा या दोन्ही योजना खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. तरीही खुद्द अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांनीच हे ठराव नामंजूर केले.
- माणगाव शहराचा विस्तार, लोकसंख्या वाढत असताना नागरी सुविधांची कमतरता.
- सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासारख्या मूलभूत प्रश्नांवर शिंदे गट आणि अजित पवार गटात श्रेयासाठी राजकारण.
- खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री भरत गोगावले यांच्या राजकीय संघर्षात माणगावच्या विकासाचा वेग मंदावला.
- सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरून प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी.



























































