
एटीएममध्ये पत्र्याची पट्टी लावून ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या भामट्याच्या तळोजा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आकिब खान असे अटक आरोपीचे नाव आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सीसीटीव्ही कमांड सेंटरमधील अंमलदारांची सतर्कता आणि बीट मार्शलच्या तत्परतेमुळे ही कारवाई करण्यात आली.
आकिब खान हा एटीएमच्या कॅश डिस्पेन्सिंग स्लॉटमध्ये पत्र्याची पट्टी अडकवून ग्राहकांची रक्कम बाहेर न पडता स्लॉटमध्येच अडकवण्याची युक्ती वापरत होता. त्यानंतर ग्राहक निघून गेल्यानंतर अडकलेली रक्कम घ्यायचा. तळोजा फेज-१ येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये आकिब हा कॅश डिस्पेन्सिंग स्लॉटमध्ये पत्रा अडकवत असताना त्याची संशयास्पद हालचाल सीसीटीव्ही कमांड सेंटरमधील पोलिसांच्या निदर्शनास आली. कमांड सेंटरमधील अंमलदारांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आकिबला अटक केली.
लाखोंचा गंडा
वाहनावर चलन आकारल्याचा बनावट संदेश पाठवून सायबर भामट्याने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबोली येथे राहणारे कासीम शेख यांच्या मोबाईल वर वाहतूक पोलिसांनी वाहनावर चलन आकारल्याचा मेसेज आला. या संदेशासह एक लिंकही पाठवण्यात आली होती. कासीम यांनी लिंक ओपन करताचा त्यांचा मोबाईल हॅक झाला आणि सायबर भामट्याने बँक खात्यातून ५ लाख २० हजार रुपये काढून घेतले.


























































