Crime news – अक्कलकोटमध्ये एक कोटीचा गांजा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने आळगी (ता. अक्कलकोट) येथे उसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची झाडे जप्त केली. या कारवाईत तब्बल 211 किलो वजनाची 240 गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत 1 कोटी 5 लाख 55 हजार रुपये असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकने यांनी दिली.

मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार (वय 60, रा. शेगाव, ता. अक्कलकोट) असे गुन्हा दाखल कलेल्या शेतकऱयाचे नाव आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या आदेशानुसार अक्कलकोट दक्षिण ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सहायक निरीक्षक प्रशांत बधे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नियुक्त केले होते.

सोमवारी (दि. 28) पोलीस पथक करजगी दूरक्षेत्र परिसरात पेट्रोलिंग करीत असताना आळगी येथील मलप्पा बिराजदार याच्या उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने कारवाई केली. उसाच्या शेतात सुमारे 12 फूट उंचीची 240 झाडे आढळली. त्यापैकी 210 झाडे जिवंत, तर 30 झाडे वाळली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या झाडांचे वजन 211 किलो 100 ग्रॅम भरले.