गरबा-दांडियावर खर्च नको; दुष्काळग्रस्तांना मदत करा, मराठी एकीकरण समितीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

राज्यातील शेतकरी संकटात असताना गरबा-दांडिया तसेच अन्य मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याऐवजी तो निधी संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवावा, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. एकीकडे शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करणे योग्य नसल्याची भूमिका समितीचे अध्यक्ष गोवर्धन देखमुख यांनी मांडली आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांत अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत नवरात्रोत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज असल्याचे समितीने म्हटले आहे. नवरात्रोत्सवातील आनंदाला विरोध नसून उत्सव साजरा करताना समाजातील संकटग्रस्त घटकांचीही जाणीव ठेवावी. गरबा दांडियासाठी होणाऱ्या अनावश्यक खर्चातील काही हिस्सा शेतकरी, अतिवृष्टीग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी वापरल्यास त्यातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण होईल, अशी भूमिका समितीने मांडली आहे.

नुकसानभरपाई

महाराष्ट्रात अनेक भागांत दुष्काळ असल्यामुळे शहरी भागात होणारे भव्य गरबा दांडियाचे आयोजन रद्द करून तो खर्च ग्रामीण भागांत पाण्यासाठी, सुविधांसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून वापरला पाहिजे. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत शेतीच्या नुकसानभरपाई आणि पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सहाय्य मिळणे यासाठी गरजेचे असल्याचेही समितीने नमूद केले आहे.