सामना अग्रलेख – शाब्बास, कॅप्टन मच्छार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅ. मच्छार यांच्या साहसी कृतीमुळे ‘फ्लाय दुबई’च्या विमानाचा होणारा अनर्थ टळला व त्याचा ‘इव्हेन्ट’ मोदी यांना करता आला. जणू 35 हजार फुटांवरील 174 लोकांचे प्राण वाचवण्याचे श्रेय ‘भाजप’चेच आहे. कॅ. स्मित मच्छार हे याक्षणी फक्त भारतीय आहेत. त्यांनी भारतीय शौर्याचा झेंडा फडकवला आहे. एका दहशतवादी हल्ल्याचा कट 35 हजार फुटांवरून खाली कोसळवण्यात आला. कॅ. मच्छार यांचे काैतुक करावे तेवढे थोडेच. एका भारतीयाने जगाला दाखवून दिले की, दहशतवादाशी जमिनीवर आणि हवेतही लढता येते. कॅ. मच्छार यांच्या हिमतीस जगाने दाद दिली आहे!

जागतिक मंचावर दहशतवादाविरुद्ध ठराव आणि भाषणे झोडली जात असली तरी दहशतवाद विविध रूपांत समोर येत असतो. दुबईहून इस्रायलकडे जाणारे ‘फ्लाय दुबई’चे विमान इस्रायलमध्येच आदळवून ‘आत्मघातकी’ पद्धतीने हल्ला करण्याचा कट भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्यामुळे उधळला गेला. कॅ. मच्छार यांच्या धाडसामुळे 174 प्रवाशांचे प्राण वाचले यावर पंतप्रधान मोदी, प्रे.ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू वगैरेंनी कॅ. मच्छार यांचे अभिनंदन केले. त्यांना ‘रिअल हीरो’ म्हणून गौरवले. शुक्रवारी मोदी यांनी इस्पितळात असलेल्या कॅ. मच्छार यांच्याशी व्हिडीओ काॅलद्वारे बातचीत केली व सर्व वाहिन्यांवर त्याचे ‘लाईव्ह’ चित्रण प्रसारित केले. ते अपेक्षितच होते. कॅ. मच्छार हे नक्कीच आता संपूर्ण भारतीयांचे ‘नायक’ ठरले आहेत. त्यांनी शौर्य आणि प्रसंगावधान दाखवले नसते तर ‘तेल अवीव’ येथे फार मोठा घातपात घडवून जगाला हादरा देण्याचा डाव यशस्वी झाला असता. आता काय होईल? आता भाजपच्या परंपरेप्रमाणे या वीर पुरुषाला ताब्यात घेऊन भाजपचा ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ बनवण्याचा प्रयोग होईल व मोदी यांच्यापासून प्रेरणा घेऊन कॅ. मच्छार यांनी विमानात शौर्य दाखवले असा प्रचार सुरू होईल. कॅ. मच्छार यांनी जिवाची बाजी लावून दहशतवादी हल्ला परतवून लावला नसता तर आणखी एक ‘9/11’ हवेत घडू शकले असते.

दुबईहून तेल अवीवकडे

निघालेल्या ‘फ्लाय दुबई’च्या ‘एफझेड – 1073’ या बोईंग 737 मॅक्स विमानात सुमारे 35 हजार फूट उंचीवर ओमानी वंशाच्या सहवैमानिकाने कॅ. मच्छारवर चाकूने वार केले व विमान कोसळवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत विमान काही सेकंदांत 14 हजार फूट खाली आले, पण काॅकपिटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कॅ. मच्छार यांनी त्याही स्थितीत काॅकपिटचे दार उघडून आणीबाणीचे संकेत दिले. प्रवासी व इतर कर्मचारी आत येईपर्यंत त्यांनी विमानावरचे नियंत्रण सोडले नाही. शेवटी सौदी अरेबियातील तबुक येथे कॅ. मच्छार यांनी विमान सुरक्षित उतरवून 174 प्रवाशांचे प्राण वाचवले. यात लहान मुलेही होती. विमानातील बहुसंख्य प्रवासी हे इस्रायलचे असावेत व या प्रकारामागे इस्रायलच्या युद्धखोरीचा राग असावा. इस्रायलने गाझा पट्टीत लाखो बॉम्ब टाकून हजारो माता व अर्भकांना, लहान मुलांना ठार केले. हे कृत्य अमानुष आहे. मात्र त्याच इस्रायली वंशाच्या लहान मुलांचे प्राण भारतीय वैमानिकाने वाचवले. जखमी अवस्थेतही कॅप्टनने काॅकपिटचे दार उघडून प्रवाशांना सावध करण्याचे प्रसंगावधान दाखवले. हे सर्व प्रदीर्घ अनुभवातून सुचत असते. कॅ. मच्छार यांच्या या साहसी निर्णयामुळे काय लक्षात येते तर विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन कितीही प्रगत झाले असले तरी हवेतील सुरक्षा ही अजूनही माणसाच्या निर्णयावरच अवलंबून आहे. अत्याधुनिक विमानात स्वयंचलित यंत्रणा, सुरक्षेची साधने व

कठोर तपासण्या

असूनही विमानात धारदार चाकू पेहोचला व त्या चाकूच्या बळावर सहवैमानिकाने 35 हजार फुटांवर काॅकपिटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. ज्या विमानतळावरून हा सहवैमानिक चढला, तेथील सुरक्षा तपासणीतून ‘चाकू’ त्याच्याबरोबर विमानात गेला. इस्रायलबरोबरच्या युद्धात ओमान इराणला मदत करत आहे. त्यामुळे इस्रायलच्या मार्गावरील उड्डाणांसाठी ओमानी वैमानिकाला परवानगी कशी मिळाली? हा प्रश्न आहेच. अर्थात कॅ. मच्छार यांच्या साहसी कृतीमुळे ‘फ्लाय दुबई’च्या विमानाचा होणारा अनर्थ टळला व त्याचा ‘इव्हेन्ट’ मोदी यांना करता आला. कॅ. मच्छार यांचे मुंबईतील नातेवाईक शोधून त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचवण्यात आले. जणू काही 35 हजार फुटांवरील 174 लोकांचे प्राण वाचवण्याचे श्रेय ‘भाजप’चेच आहे. कॅ. स्मित मच्छार हे याक्षणी फक्त भारतीय आहेत. त्यांनी भारतीय शौर्याचा झेंडा फडकवला आहे. ‘9/11’, ‘26/11’ सारखे दहशतवादी हल्ले, कंदहारसारखी विमान अपहरणे यामुळे जग त्रस्त आहे व जगातला दहशतवाद संपावा असे प्रत्येकाला वाटते. मात्र तरीही वेगवेगळ्या पद्धतीने जगभरात दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. एका दहशतवादी हल्ल्याचा कट 35 हजार फुटांवरून खाली कोसळवण्यात आला. कॅ. मच्छार यांचे काैतुक करावे तेवढे थोडेच. एका भारतीयाने जगाला दाखवून दिले की, दहशतवादाशी जमिनीवर आणि हवेतही लढता येते. कॅ. मच्छार यांच्या हिमतीस जगाने दाद दिली आहे!