
>> अरुण
आज 4 ऑक्टोबर. माणसाने निर्माण केलेलं एक छोटंसं यान अवकाशात पहिल्यांदाच यशस्वीरीत्या झेपावलं आणि पृथ्वीभोवती फेर धरू लागलं तो दिवस! ‘स्पुतनिक-1’ या रशियाच्या किंवा त्यावेळच्या ‘यूएसएसआर’च्या शास्त्रज्ञांचं बौद्धिक यश सिद्ध करणारा क्षण. स्पुटनिक-1 नावाचा जगातला पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात पोचला आणि रशिया आनंदला, जग स्तिमित झालं तर अमेरिका (मनातून) हादरली. प्रतिस्पर्ध्याचं तोंडदेखलं कौतुक तर करावच लागलं पण रशियाने आपल्या आधी अवकाश गाठलं याचं वैषम्य अमेरिकेला अधिक वाटलं असणार.
त्यावेळचा, म्हणजे 69 वर्षांपूर्वीचा रशिया लाल कम्युनिस्ट होता. झारशाही उलथवणाऱया क्रांतीनंतर ही राजवट आली होती. हा संदर्भ लक्षात घेऊन आर. के. लक्ष्मण यांनी सूचक व्यंगचित्र लगेचच काढलं. त्यात ‘स्पुतनिक’ पृथ्वीभोवती फिरताना दाखवून त्याला रशियाचा सर्वाधिक क्रांतिकारी (रेव्हल्यूशनरी) असं गमतीने म्हटलं होतं. कारण रेव्हल्यूशनचा एक अर्थ फेरी मारणे असाही होतो. पृथ्वीभोवती अवघ्या 90 मिनिटांत ‘स्पुतनिक-1’ फिरत होता म्हणून तो ‘ग्रेटेस्ट रेव्हल्यूशनरी’ ठरला!
तर या संशोधनाने जे यश प्राप्त केले तेव्हापासून अवकाश अभ्यासाचा ‘मार्ग’च बदलला. आता तो पृथ्वीवरून अवकाश न्याहळण्यापुरता सिमीत नव्हता, तर थेट गगनाला गवसणी घालणारा, अवकाश भरारी घेणारा असणार होता. त्याचं प्रत्यंतर गेल्या 70 वर्षांत अनेकदा आलंच आहे. रशियाच्या या यशाने दिपून अमेरिकेने 1970 च्या आत माणूस चंद्रावर उतरवण्याची घोषणा केली. तुम्ही नुसतं यान अवकाशात सोडलंत, गागारिनला अंतराळात पाठवलंत तर आम्ही साक्षात चंद्र चांद्रभूमीवरच उतरणार. अशी ही काहीशी असूयात्मक स्पर्धा!
ते काही असो पण ‘स्पुतनिक’ने एवढी कमाल केली की, नंतरचा काही काळ कोणत्यी कृत्रिम उपग्रहाला ‘स्पुतनिक’ संबोधलं जाऊ लागलं. तो उपग्रहाला पर्यायवाचक उद्गार ठरला. काहींनी तर त्या काळात मुलांची नाव ‘स्पुतनिक’ ठेवली. (कालांतरने स्कायलाब हेही नाव ऐकलं)
एवढंच काय तर स्पुटनिकने अल्पकाळासाठी का होईना अवकाशाला स्पर्श करून, पृथ्वीभोवती भ्रमण करून इतिहास घडवला. तीच आजची तारीख 4 आाक्टोबर (1957). तेव्हापासून माणसाची अवकाशी यानदौड अव्याहत सुरूच आहे आणि पुढे अधिक वेग घेणार आहे.



























































