
राज्यात एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि दिल्लीत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांची विकेट सोबत घेऊ. भीमनवार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय कुणीही येथून जाणार नाही. तीन दिवस लागोत, साठ दिवस लागोत किंवा तीन महिने लागू देत, असा आक्रमक पवित्रा कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके एमपीएससीच्या आंदोलनात घेतला.
आपल्या देशाची परिस्थिती अशी आहे की, जो शिकलेला आहे, ज्याच्याकडे पदवी आहे तो रस्त्यावर बसला आहे आणि ज्याच्याकडे पदवी नाही तो खुर्चीवर बसला आहे, अशी टीकाही दीपके यांनी केली. एमपीएससी आता पवित्र राहिलेली नाही. पेपर पह्डणारा आणि पैसे खाणारा आत्महत्या करतोय का? असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांनी मनात आत्महत्येचा विचार आणू नये, असे आवाहन त्यांनी केले.
पेपरच फुटत असतील तर विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून काय उपयोग? आता विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून पुणे बंद पाडले पाहिजे. मी असे बोलल्यावर फडणवीस म्हणतील, मी अराजकता पसरवत आहे, पण पेपर फोडणे, पक्ष फोडणे आणि आमदार फोडणे ही अराजकता आहे, असा टोला दीपके यांनी लगावला.




























































