विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत धुसफूस, परस्परांच्या विरोधात अर्ज दाखल करण्याची तयारी; भाजपकडून तीन उमेदवारांची नावे जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vidhan bhavan mumbai

महाराष्ट्रात होत असलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा निर्णय सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर घेतला आहे. त्यानुसार पुणे शिक्षक, पुणे व नागपूर पदवीधरची जागा भाजप तर अमरावती शिक्षक शिंदे गट आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधरची जागा अजितदादा गटाच्या वाटय़ाला गेली आहे. त्यानुसार भाजपने आपले आपले तीन उमेदवार आज जाहीर केले. मात्र हे जागावाटप आणि उमेदवारीवरून महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. पुणे व अमरावतीत इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकावत परस्परांच्या विरोधात अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

विधान परिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत. पुणे पदवीधरसाठी अजित पवार गट आग्रही होता. पण ही जागा भाजपला गेल्याने अजितदादा गटात प्रचंड नाराजी असून पक्षाचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी ही जागा कोणत्याही परिस्थितीत लढवणारच असून पक्षाची पूर्ण तयारी झाली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता मैत्रीपूर्ण लढत होते की उघड बंडखोरी, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्ती प्रताप उैर्फ भय्या माने यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपुरात भाजपमध्येच कुरघोडी

नागपूर पदवीधरसाठी भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. सलग दुसऱ्यांदा उमेदवारी डावलल्याने माजी आमदार अनिल सोले यांनी कुरघोडी करत बंडाचे निशाण फडकावले असून उद्या ते आपला अर्ज दाखल करणार आहेत.

अमरावतीत शिंदे आणि अजितदादा गट आमने सामने

अमरावतीच्या उमेदवारीवरून शिंदे गटातच वाद आहे. विद्यमान आमदार किरण सरनाईक हे शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. तर माजी आमदार श्रीकांत देशपांडे हेदेखील शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी दोन अर्ज दाखल केले असून शिक्षक आघाडीकडून लढण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे. दुसरीकडे अजित पवार गटाकडून दिलीप कडू यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे.

पुणे शिक्षकमधून शिंदे गटाचे बंड

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून मागील काही महिन्यांपासून मोर्चेबांधणी सुरू होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि मंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सचिन सानप येथून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, मात्र महायुतीत ही जागा भाजपला गेल्याने या दोघांचाही हिरमोड झाला असून चिवटे यांनी बंडाची तयारी सुरू केली आहे.

पुण्यात भाजपकडून धक्कातंत्र

पुणे पदवीधरमधून माजी आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते, मात्र भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करत ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करत डॉ. स्मिता जाधव यांच्या गळय़ात उमेदवारीची माळ घातली. तर पुणे शिक्षकमधून काwस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुणे पदवीधरच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.