पैशांची अन् पाण्याची उधळपट्टी, रस्ते चकाचक करण्यासाठी पालिका आठ कोटी रुपये खर्च करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाण्याचा काटकसरीने वापर करा, असा नागरिकांना सल्ला देणारी मुंबई महापालिकाच आता रस्ते चकाचक करण्याच्या नावाखाली लाखो लिटर पाण्याचा अपव्यय करण्याच्या तयारीत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील प्रमुख रस्ते उच्च दाबाच्या पाण्याने धुण्यासाठी सात परिमंडळांत पाण्याचे टँकर भाडय़ाने घेण्यासाठी आठ कोटी रुपयांचे पंत्राट स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवले आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्यासोबत कोटय़वधी रुपयांचीही उधळपट्टी होणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 17 मे 2027 पर्यंत पुरेल इतकाच असल्यामुळे मुंबईवरील 10 टक्के पाणीकपातीचे संकट अद्याप कायम आहे. असे असतानाही पालिकेने 26 विभागांमधील सुमारे 657 किलोमीटर लांबीचे तब्बल 377 सार्वजनिक रस्ते जेटिंग पद्धतीने धुण्यासाठी निश्चित केले आहेत. पावसाळा वगळून 150 दिवसांच्या कालावधीसाठी दोन हजार लिटर, पाच हजार लिटर आणि दहा हजार लिटर क्षमतेचे टँकर भाडेतत्त्वावर घेतले जाणार असून या टँकर्सच्या माध्यमातून हजारो फेऱ्या मारून लाखो लिटर पाणी रस्त्यांवर फवारले जाणार आहे. धूळ नियंत्रणासाठी आधुनिक, यांत्रिक स्वीपिंग तंत्रज्ञानाचा किंवा शास्त्रोक्त झाडलोटीचा प्रभावी वापर करण्याऐवजी पाण्याचा बेसुमार अपव्यय करून कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सातही परिमंडळांत पाण्याचे टँकर भाडय़ाने घेण्यासाठी कंत्राट

कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा उद्योग पालिकेने या कामासाठी सातही परिमंडळांत ई-निविदा काढून मर्जीतील कंत्राटदारांची शिफारस केली असून पालिकेच्या तिजोरीतून तब्बल 8 कोटी 24 लाख रुपयांहून अधिक निधी दिला जाणार आहे. लाखो लिटर पाण्याचा अपव्यय करून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचाच हा उद्योग असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.