विमानतळावरून 4.12 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हायड्रोपोनिक गांजाच्या तस्करीप्रकरणी एकाला सीमा शुल्क विभागाने अटक केली. मोहंमद सोहेल सय्यद मेहबूब असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 4 कोटी 12 लाख रुपयांचा गांजा जप्त केला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

काwलालंपूर येथून एक जण हायड्रोपॉनिक गांजाची तस्करी करणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली. त्या माहितीनंतर शनिवारी रात्री सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचला. सापळा रचून मोहंमद सोहेलला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली. त्याच्या बॅगेत बारा प्लॅस्टिकचे पाकीट आढळून आले. त्यात प्रत्येकी 1 किलो हायड्रोपॉनिक गांजा होता. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 4 कोटी 12 लाख रुपये इतकी आहे. मोहंमद सोहेलला ते गांजाचे पाकीट एका व्यक्तीने दिले होते. त्यासाठी त्याला विमानाचे तिकीट आणि काही रक्कम कमिशन म्हणून दिली जाणार होती. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. मोहंमद हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी परदेशात गेला होता. तेथून परत येताना त्याने तो गांजा आणल्याचे तपासात समोर आले आहे.