
देश आणि राज्यात महत्वाच्या परीक्षेंच्या पेपरफुटीचे सत्र सुरू असतानाच आज महाज्योती शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे आणि नांदेड केंद्रावर तांत्रिक गोंधळामुळे परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. राज्यात अन्य दोन केंद्रांवरही असाच प्रकार घडल्याने तेथील परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकारामुळे संतापलेल्या परीक्षार्थींनी व्यवस्थापनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.
आंबेगाव बुद्रुक येथील सन ब्राईट स्कूल या परीक्षा पेंद्रावर महाज्योती शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पेपर सुरू होताच केंद्रावर मोठय़ा प्रमाणात तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. अनेक विद्यार्थ्यांचे संगणक सुरूच झाले नाहीत, तर काहींचे लॉगइन होऊ शकले नाही. काही विद्यार्थ्यांचेच यशस्वी लॉगइन झाले. काहींचे संगणक परीक्षा सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच बंद पडले किंवा अचानक लॉगआउट झाले.
विद्यार्थ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, केंद्रावर पुरेसे संगणक उपलब्ध नसल्यामुळे आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. तांत्रिक गोंधळामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेत योग्य रीतीने सहभागी होऊ शकले नाहीत.
अतुल सावेंचाही राजीनामा घ्या
विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये सातत्याने अडचणी निर्माण होत असल्याचा दावा करून आमदार रोहित पवार यांनी संबंधित प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांच्यासोबतच मंत्री अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
चौकशी करून कारवाई करणार – मिलिंद नारिंगे
महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे म्हणाले, ठराज्यभरातील 64 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. पुण्यातील एका केंद्रावर ‘लॉगिन’ होत नसल्याने तांत्रिक कारणास्तव ती परीक्षा रद्द करावी लागली. ही परीक्षा आता 10 ऑक्टोबरला होईल. नांदेडमधीलही एका पेंद्रावरील परीक्षा रद्द करण्यात आली आहे. कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही किंवा गैरव्यवहार झालेला नाही. सर्व वर्गांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले असून, चौकशीत दोषी आढळणाऱया पेंद्र व निरीक्षकांवर कडक कारवाई केली जाईल.






























































