सोमठाण्यात तिहेरी हत्याकांड…आई, मुलगा आणि नातवाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिखली तालुक्यातील सोमठाणा गावात गुरुवारी सायंकाळी तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली. या घटनेत सरस्वतीबाई सुरडकर (७०), संजय सुरडकर (४५) आणि रणजीत संजय सुरडकर (२०) यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दीपक सुरडकर याने आपल्या आईसह भाऊ आणि पुतण्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, कौटुंबिक वादातून ही घटना घडली, की अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, संशयित आरोपी दीपक सुरडकर याचा शोध सुरू असून, तपासानंतरच या तिहेरी हत्याकांडामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.