दिल्लीला जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस रद्द; 57 मेट्रो स्थानकं बंद ठेवण्याचा प्रस्ताव, ‘कॉक्रोच’च्या भीतीने राजधानीत कडेकोट बंदोबस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार यादी पुनरिक्षण प्रकिया (एसआयआर) आणि निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभाराविरोधात कॉक्रोच जनता पार्टी 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट बंदोबस्त केला जात असून जंतरमंतरला छावणीचे स्वरुप आले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी आणि रेल्वेने मोठे पाऊल उचलले असून आज रात्री 9 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत 57 मेट्रो स्थानके बंद करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच शनिवारी पहाटे 4 ते दुपारी 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीने स्टेशनवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

दिल्ली पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या संयुक्त आयुक्तांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्रात 57 प्रमुख मेट्रो स्टेशन्सचे दरवाजे बंद ठेवण्याचे तसेच ट्रेनची फ्रीक्वेन्सी कमी करण्याचे नमूद केले आहे. हे निर्बंध आज 9 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजल्यापासून लागू होऊन परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

बंद राहणाऱ्या 57 स्टेशन्समध्ये राजीव चौक, केंद्रीय सचिवालय, नवी दिल्ली, पटेल चौक, मंडी हाऊस, आयटीओ, काश्मिरी गेट, हाऊस खास, पतियाळा हाऊस, सुप्रीम कोर्ट, खान मार्केट आणि लाजपत नगर यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती स्टेशन्सचा समावेश आहे.

10 तासांसाठी रेल्वे गाड्या रद्द

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 ते दुपारी 2 या 10 तासांच्या कालावधीत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गुरुवारी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे सुमारे 5000 प्रवाशांची ट्रेन चुकल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. तसेच पूर्व रेल्वेने आज निघणाऱ्या 12301 हावडा-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आणि 12313 सियालदह-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या रद्द केल्याची घोषणा केली आहे.

पोलिसांनी परवानगी नाकारली

दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीला जंतरमंतरवर आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. संयुक्त पोलीस आयुक्त नुपूर प्रसाद यांना शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. आंदोलनाच्या परवानगीसाठी नुकताच प्राप्त झाला आहे. नियमांनुसार 10 आधी पोलिसांना कळवणे आवश्यक आहे. सीजेपीने याआधी केलेल्या आंदोलनावेळी नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच नवी दिल्लीत कलम 163 लागू असून याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे नुपूर प्रसाद म्हणाल्या.