शोले स्टाईलचा थरार! प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने तरुण थेट मोबाईल टॉवरवर चढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात ‘शोले’ सिनेमातील एका प्रसिद्ध दृश्याची आठवण करून देणारा अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला आहे. आपल्या रुसलेल्या प्रेयसीसोबत लग्न करण्याच्या हट्टापोटी एक तरुण चक्क एका उंच मोबाईल टॉवरवर चढल्याची घटना घडली. प्रेयसीने लग्नास स्पष्ट नकार दिल्याने या तरुणाने थेट तिच्या गावी धडक मारत सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलले होते. सुदैवाने, पोलिसांनी प्रसंगावधान राखत मोठ्या शिताफीने या तरुणाला सुरक्षित खाली उतरवण्यात यश मिळवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बलिया जिल्ह्यातील मिल्की गावात राहणारा विशाल आणि बिजनौरची सुजाता हे दोघं गुजरातच्या एकाच कंपनीत एकत्र कामाला होते. त्या कालावधीत दोघांमध्ये जवळीक वाढल्याने ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही काळानंतर सुजाता तिच्या बहिणीच्या घरी बागपत येथील आदमपूर गावात परतली. मात्र, विशालला तिला पुन्हा सोबत घेऊन जायचे होते, परंतु लग्नाच्या तारखेवरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला होता, ज्यामुळे सुजाता रागाने आपल्या घरी निघून आली होती.

सुजाताला लवकरात लवकर लग्न करायचे होते, तर विशालची अट होती की, तो आधी त्याच्या बहिणीचे लग्न उरकून मगच सुजाताशी लग्न करेल. यावरून संतापलेल्या सुजाताने त्याच्यासोबत जाण्यास व लग्नाला साफ नकार दिला आणि त्याला परत निघून जाण्यास सांगितले. आपल्या प्रेयसीची कशीतरी समजूत काढण्यासाठी विशाल बागपतला पोहोचला, परंतु  कोणताही तोडगा निघू शकला नाही. यातूनच नैराश्य आणि संतापाच्या भरात तो एका मोबाईल टॉवरवर चढला आणि तिथेच मोठा गोंधळ घालू लागला.

तरुण टॉवरवर चढल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत विशालची समजूत काढण्यास सुरुवात केली आणि त्याला सुखरूप खाली आणण्यासाठी बरीच मेहनत घेतली. त्यानंतर पोलिसांनी सुजातासोबत त्याच्या संभाषणाची विशेष व्यवस्था केली. यादरम्यान, विशाल आधी त्याच्या बहिणीच्या लग्नाची सर्व व्यवस्था करेल आणि त्यानंतर दोघे विवाह करतील, असा तोडगा निघाल्यावर वातावरण शांत झाले. यानंतर पोलिसांनी विशालचे समुपदेशन करून त्याला सुखरूप बलिया येथे परत पाठवले.