CJP ने आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांना मागितली परवानगी; दिला २४ तासांचा अल्टिमेटम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी योग्य तारीख मिळावी, या मागणीसाठी सीजेपीच्या नेत्यांनी सोमवारी संसद मार्ग पोलीस ठाणे गाठले. यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांना आंदोलनाची तारीख आणि वेळ निश्चित करण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला असून, प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा थेट इशारा सीजेपीला दिला आहे. PTI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी पोलीस ठाण्याबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जंतरमंतरवर आम्हाला आमचे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करायचे असून, त्यासाठी आम्ही पोलिसांकडे अधिकृत तारखेची मागणी करत आहोत. पोलीस आम्हाला लवकरात लवकर तारीख देतील, अशी आम्हाला आशा आहे. मात्र त्यांना निर्णय घेण्यासाठी आम्ही २४ तासांचा वेळ दिला आहे. जर पोलिसांनी येत्या २४ तासांच्या आत आम्हाला आंदोलनासाठी वेळ आणि तारीख दिली नाही, तर आम्ही आमच्या वतीने नव्याने आंदोलनाची हाक देऊ, असे सीजेपीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात सध्या इंडिया आघाडीसह विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथील आंदोलनाची परवानगी अलीकडेच रद्द केली होती आणि संसदेकडे जाणारे अनेक रस्ते बंद केले आहेत. मध्य दिल्लीत आधीच रॅपिड ॲक्शन फोर्स आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशातच सीजेपीने दिल्ली पोलिसांना आंदोलनाला परवानगी देण्यासाठी २४ तासांच्या अल्टिमेटम दिला आहे.