
फ्लायदुबई विमान अपहरण प्रकरणाला नवे वळण लागले आहे. विमान अपहरण प्रकरणी संयुक्त अरब अमिरातीने (UAE) महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. UAE पोलिसांनी फ्लायदुबईसाठी काम करणाऱ्या मालदीवच्या दोन वैमानिकांना अटक केली आहे. या दोन्ही वैमानिकांना एअरलाइनने अलीकडेच मालदीवमधून भरती केले होते.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, या वैमामिकांना 3 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. या वैमानिकांच्या कुटुंबीयांना त्यांच्या अटकेची माहिती देण्यात आल्याचे यूएईमधील मालदीवियन दूतावासाने सांगितले. या दोन वैमानिकांच्या अटकेवर भाष्य करण्यास मालदीवियन अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही वैमानिक अल-हम्मामी याच्या इमारतीत राहत होते आणि त्याच्या संपर्कात होते. तथापि, अधिकाऱ्यांनी अद्याप या प्रकरणाशी त्यांचा संबंध किंवा त्यांच्याविरुद्धचे पुरावे उघड केलेले नाहीत.



























































