नालासोपाऱ्यात नवजात बाळाची 40 हजारांना विक्री, अल्पवयीन मुलीची प्रसूती; अर्भकाचा सौदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नालासोपाऱ्यातील खासगी सूर्या रुग्णालयात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्यानंतर तिच्या नवजात बाळाची ४० हजार रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसूती होताच दुसऱ्या दिवशी अर्भकाचा सौदा झाला. याप्रकरणी एका २२ वर्षीय अज्ञात तरुणावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान मुलीची आई, प्रसूती करणारे डॉक्टर शाहीन शेख, नवजात बाळ खरेदी करणारे दाम्पत्य व अन्य एक महिला अशा एकूण सहाजणांविरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केलेल्या तरुणाला आज न्यायालयात हजर केले असता त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या बाळ विक्रीमागे कोणते रॅकेट आहे काय, याचाही तपास सुरू आहे. नालासोपारा पूर्वेतील संतोष भवन परिसरात असलेल्या सूर्या रुग्णालयात अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली. ही प्रसूती डॉ. शाहीन शेख यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

दुसऱ्या दिवशी सोमवारी लगेच नवजात अर्भकाला ४० हजार रुपयांच्या मोबदल्यात विकण्यात आले. त्यानंतर लगेच त्या मुलीला डिस्चार्जही देण्यात आला. ही मुलगी घरी गेल्यानंतर रात्री परत तिच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे तिला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला तपासले असता तिची डिलिव्हरी झाली असावी असा संशय आला. ही मुलगी अल्पवयीन असल्याने डॉक्टरांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.