
कळंबोली वसाहतीमधील पाणी प्रश्न पेटला आहे. नळाला टिपूसही येत नसल्याने संतप्त महिलांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आज सिडकोच्या कार्यालयावर धडक दिली. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेरावही घालण्यात आला. महिलांनी कार्यालयाचा दरवाजा अडवला. जोपर्यंत पाणी पुरवठ्याची ठोस हमी मिळत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना सिडकोच्या कार्यालयात जाऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. पाणी का येत नाही याचा जाबदेखील विचारला.
कळंबोली वसाहत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर विस्तारत असून येथील रहिवाशांना सुमारे ३२ दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याची गरज आहे. पण प्रत्यक्षात फक्त २१ दशलक्ष लिटर एवढेच पाणी मिळते. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांच्या दैनंदिन कामावर परिणाम झाला असून उंच इमारतींमध्ये तर पाणीच पोहोचत नसल्याने रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वारंवार होणारे शटडाऊन आणि अलीकडे दहा टक्के केलेली पाण्याची कपात यामुळे नागरिक वैतागले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाणीटंचाईच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपक निकम, विभागप्रमुख विश्वास पेटकर, महेश गुरव व अन्य पदाधिकाऱ्यांनी नागरिकांसह सिडकोच्या कार्यालयावर आज धडक आंदोलन केले. पाणीपुरवठा वाढवून देऊ असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.



























































